जुनी वास्तू मोजतेय अखेरची घटका
By Admin | Updated: August 3, 2014 22:42 IST2014-08-03T22:06:05+5:302014-08-03T22:42:59+5:30
पोलीस स्थानक : चितारआळीतील इमारतीची दुर्दशा

जुनी वास्तू मोजतेय अखेरची घटका
प्रसन्न राणे - सावंतवाडी ,, चितारआळी येथील संस्थानकालीन पोलीस स्थानकाच्या जुन्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. आता ही इमारत अधिकाधिक धोकादायक ठरत आहे. ही इमारत चितारआळीच्या सार्वजनिक गणेश उत्सवस्थळाच्या लगतच असल्याने तसेच आसपास नागरिकांची घरे असल्याने इमारत कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, वारंवार निवेदन देऊनही शासन बेजबाबदारपणे याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
चितारआळी येथील ही पोलीस ठाण्याची जुनी इमारत जीर्ण झाली आहे. ही वास्तू आता बऱ्याच वर्षांचा उन्हापावसाचा मारा सोसत मोडकळीस आली आहे. तसेच भिंतींनाही मोठमोठे तडे गेल्यामुळे त्या कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. छप्परही पूर्णत: मोडकळीस आल्याने इमारतीत पाण्याचा साठा होतो. यामुळे ही इमारत म्हणजे आसपासच्या नागरिकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
गणेशोत्सव तोंडावर आला असून चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे या ठिकाणी अनंत चतुर्थीपर्यंत पूजन केले जाते. या गणेशोत्सवाचा मंडपही या जीर्ण इमारतीच्या लगतच उभारला जातो. यामुळे या मोडकळीस आलेल्या जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेश भोगटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांताधिकारी, नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदने दिली होती. परंतु सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मोडकळीस आलेल्या जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीत तत्काळ दुरुस्ती व्हावी, यासाठी १५ आॅक्टोबर २०११ रोजी कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले होते. चितारआळीतील या इमारतीच्या आसपास राहणाऱ्या संदीप पाटील, शिवनाथ वाळके, देवराज सुराणा, संतोष मडगावकर, उमेश मुद्राळे तसेच अन्य कुटुंबाच्या घरांना या इमारतीपासून धोका असल्याचे या निवेदनात नमूद केले होते.
यानंतर याच इमारतीचे छप्पर पूर्णपणे कोसळल्याने गळती सुरू होती. त्यामुळे इमारतीत पाणी साचून इमारत पडण्याची शक्यता आहे, अशा संदर्भाचे निवेदन ५ जून २०१२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, प्रांताधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनाही देण्यात आले होते. मात्र, तीन वर्षे उलटूनही या इमारतीच्या दुरुस्तीबाबत दखल घेण्यात आली नाही. या इमारतीच्या नजीकच सावंतवाडीचा मंगळवारचा आठवडा बाजार भरतो. यावेळी शहरातील नागरिकांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते. इमारतीलगत दुकाने मांडली जातात. तसेच गणेशोत्सवावेळी तर येथे लाखो भाविक दर्शनासाठी ये-जा करीत असतात. अशावेळी इमारत कोसळल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित विभाग मात्र कोणतेही सोयरसुतक नसल्याप्रमाणे निष्क्रीय असल्याचे दिसून येत आहे.
गेली कित्येक वर्षे या इमारतीच्या नूतनीकरणासाठी वेळोवेळी अनेक निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. येथील परिसरात राहणाऱ्या तसेच येथून ये-जा करणाऱ्या लोकांच्या जीवितास या इमारतीपासून धोका निर्माण झाला आहे. अवघ्या २० दिवसात गणेशोत्सव येत असून यावेळी येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. अशावेळी अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार होणार नाही. या इमारतीच्या डागडुजीबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलनाचा पर्याय अवलंबणार आहोत.
- सुरेश भोगटे, अध्यक्ष, चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ