पर्यटकांना खुणावतोय रानपाटचा रम्य धबधबा
By Admin | Updated: November 17, 2014 23:26 IST2014-11-17T21:15:08+5:302014-11-17T23:26:37+5:30
रत्नागिरी तालुका : कोकण रेल्वेतून होते विलोभनीय दर्शन

पर्यटकांना खुणावतोय रानपाटचा रम्य धबधबा
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील रानपाट येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. १२ महिने वाहणाऱ्या धबधब्याकडे पाहून मन उल्हासित होऊन धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ करण्याचा मोह आवरला जात नाही. मात्र, या नयनमनोहर धबधब्याकडे दुर्लक्ष होत आहे.
रत्नागिरीतील लाजूळ व रानपाट या दोन बोगद्यांमध्ये असणारा हा निसर्गरम्य, आकर्षक धबधबा आपल्याला जाता-येता रेल्वेने पाहता येऊ शकतो. हे ठिकाण पाहण्यासाठी लाजूळ येथे गाडी पार्क करुन पायी १ ते १.५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
कोकणात पावसाळ्यात आपल्याला अनेक ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात. पावसाळ्यात या धबधब्याखाली जाता येत नाही. कारण पाण्याचा प्रवाह जोराचा असतो. परंतु श्रावणानंतर या पाण्याचा प्रवाह कमी होतो. त्यानंतर धबधब्याखाली आंघोळ करता येऊ शकते. या धबधब्याचे वैशिष्ट्य असे की, येथे आंघोळीसाठी कोणताही धोका नाही.
धबधब्याचे पाणी थेट अंगावर घेता येते. या धबधब्याशेजारी एक छोटा डोह आहे. यामध्ये या धबधब्याचे पाणी साचून पुढे वाहू लागते. या ठिकाणी पाण्याची उंची साधारण ३ ते ४ फूट उंच आहे. त्यामुळे या धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी लहान मुले घेऊन गेल्यास कोणताही धोका नाही.
धबधब्याशेजारी सपाट दगड असून, या ठिकाणी बसून जेवणासह अल्पोपाहार करण्यासाठी मोठी जागा आहे. धबधब्याच्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल, असा आहे. या निसर्गरम्य धबधब्याची माहिती नसल्याने हा धबधबा अजूनही दुर्लक्षित आहे. मात्र, कोकण रेल्वेने जाणाऱ्या - येणाऱ्या प्रवाशांना हा रानपाटचा धबधबा सुखावत आहे. (वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील रानपाट येथील हा धबधबा पर्यटकांना खुणावत आहे.
बाराही महिने वाहतो रानपाटचा धबधबा.
धोकादायक नसल्याने पर्यटक मनसोक्त लुटू शकतात धबधब्याखाली आंघोळीचा आनंद.
पर्यटकांची अजूनही पाठ.