कोकण रेल्वेच्या ताब्यातील भूभाग ओसाडच?
By Admin | Updated: May 29, 2015 23:47 IST2015-05-29T22:22:58+5:302015-05-29T23:47:31+5:30
ढीम्म प्रशासन : वृक्षलागवड जमिनीत करण्याची घोषणा हवेत?

कोकण रेल्वेच्या ताब्यातील भूभाग ओसाडच?
फुणगूस : कोकण रेल्वे सुरु होऊन एक तपाचा काळ लोटून गेला. मात्र कोकण रेल्वेने ताब्यात घेतलेली रेल्वेमार्गालगतचा बराच भूभाग ओसाड असून, वृक्षलागवडीच्या प्रतीक्षेत आहे. रेल्वे दाखल झाल्यानंतर उद्योग वाढतील, पर्यटक वाढतील आणि कोकणचा चेहरामोहरा बदलेल, अशी अपेक्षा होती. तो चेहराही बदलला नाही आणि कोकण रेल्वे मार्गाशेजारच्या ओसाड जमिनीचा चेहराही बदलला नाही.कोकणातील बहुतांश प्रदेश डोंगराळ असल्याकारणाने कोकण रेल्वेचा मार्ग बोगद्याबोगद्याने बनलेला आहे. बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेली प्रचंड माती, दगड, रॉ मटेरिअल टाकण्यासाठी परिसरातील आजूबाजूची जमीन मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून कोकण रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतली होती. टाकण्यात आलेल्या दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात वृक्षवेली गाडली गेल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली. कोकण रेल्वेच्या ताब्यात असलेल्या जमिनी आजही वृक्षाविना असल्याचे दिसून येत आहे. झाडी नसल्याकारणाने कोकणात प्रचंड कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात दगडमाती पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीनाल्यामध्ये जात आहे.
गत सोळा ते सतरा वर्षांमध्ये कोकण रेल्वेच्या भरावाची झालेली धूप नदीपात्रात जाऊन पडल्यामुळे नदीचे पात्र बुजले असून, काठावरील लोकांना दरवर्षी पुराचा धोका भेडसावत आहे. कोकण रेल्वेच्या ताब्यातील हे दगड मातीचे ढिगारे वृक्षलागवडीशिवाय राहिल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचे दुष्परिणाम परिसरातील जनतेला भविष्यात मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील, अशी भीती पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांची हानी झाल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेती नष्ट झाली आहे. परिसरातील जनतेला पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. ओसाड असलेल्या कोकण रेल्वेच्या ताब्यातील जमिनीवर कोकण रेल्वे प्रशासनाने चांगल्या प्रकारे वृक्ष लागवड करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अथवा प्रशासनाकडून लागवड करण्यायोग्य जमिनी भूमिहीन व्यक्तींना देऊन त्या विकसीत करण्यात याव्यात, असेही मत परिसरातील पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोकण रेल्वेने आजपर्यंत विविध उपक्रमातून त्या त्या भागातील प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. मात्र नोकऱ्या सोडाच पण कोकण रेल्वेने हाती घेतलेले अनेक उपक्रम अद्याप तसेच अपूर्म अवस्थेत राहिले आहेत. हे सर्व प्रश्न कधी सोडवणार असा प्रश्न विचारला जात आहे. (वार्ताहर)
कोकण रेल्वेला अनेक समस्यांनी घेरले असताना प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर.
रेल्वेने जमिनी घेतल्या. मात्र, तेथे वृक्ष लावलेच नसल्याचा पर्यावरणतज्ज्ञांचा आक्षेप.
कोकण रेल्वेने टाकलेल्या दगडमातीच्या ढिगाऱ्यांचे काय असा संतप्त सवाल.
वृक्ष लावण्यासाठी होतोय आग्रह.