लेडी सिंघमकडून कारवाईसाठी आराखडा तयार
By Admin | Updated: August 19, 2014 23:50 IST2014-08-19T22:38:54+5:302014-08-19T23:50:08+5:30
अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यासाठी पथक

लेडी सिंघमकडून कारवाईसाठी आराखडा तयार
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा गाढ झोपी गेली असताना अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी वेंगुर्ले जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत दोन नंबरवाल्यांमध्ये अजूनही पोलिसांची जरब आहे हे दाखवून दिले. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने टाकलेल्या या धाडीमुळे साहू यांची सर्व स्तरातून वाहवा होत आहे. जनतेच्या अपेक्षेला उतरत या लेडी सिंघमने आपला अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यासाठीचा आराखडा बनवला असून वेगळे पथक तयार केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली सहा-सात वर्षे अवैध धंदे सुसाट सुरू आहेत. गोव्यातून दिवसाढवळ्या लाखो रूपयांची दारू सिंधुदुर्गात येत आहे. या दारूमुळे उत्पादन शुल्कचा महसूल बुडतो किंबहुना शासनाचे महिन्याला कोट्यवधीचे नुकसान होते. मात्र, याकडे शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीला लक्ष देण्यास वेळ नाही. आणि येणारा अधिकारीही आपण दोन वर्षांनी जाणार, असे म्हणत वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. उत्पादन शुल्क व पोलिसांचे अनेक नाके तर दारू पकडण्याऐवजी दारू वाहून नेण्याची साधने होऊन बसले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी गाढ झोपेत असताना वेंगुर्लेत सामान्य माणसाच्या मनातील कृती प्रत्यक्षात आणण्याचे काम लेडी आॅफिसरने करून दाखवले. वेंगुर्लेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. एवढ्यापर्यंत या महिला अधिकाऱ्याचे काम सीमीत नव्हते तर तिने अवैध धंदेवाल्यांमध्ये पोलिसांची जरब दाखवून दिली आहे. ओरोस येथे पोलीस ठाण्याच्या लगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांपासून ते प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू आहे.
या सर्वात वेंगुर्ले अव्वल मानला जात असे. सावंतवाडी लगत तर मळगाव, माजगाव, कोलगाव, सातार्डा, मळेवाड, कोंडुरा आदी ठिकाणाबरोबर कुडाळमधील माणगाव तसेच दोडामार्ग या ठिकाणी जुगाराचे फड रंगत असतात. वेंगुर्ल्यातील कारवाई नंतर आतातरी यामध्ये फरक पडेल, अशी आशा सामान्य माणसाला वाटत होती. पण आजही छुप्या पद्धतीने हे फड रंगतच आहेत. (प्रतिनिधी)
गुन्हा अन्वेषणची पुनर्रचना
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग हा स्ट्राँग विभाग मानला जातो. अप्पर पोलीस अधिक्षिका विनिता साहू लवकरच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागावर आपले लक्ष केंद्रीत करणार आहे.
त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास त्यांना सोपे जाणार आहे.
ाी आताच जिल्ह्यात आलो असून, मी थोडा अभ्यास करेन. पण माझे एकच ध्येय आहे, अवैध धंद्यांचे उच्चाटन. त्यासाठी मी व माझे सहकारी दिवसरात्र काम करतील. कोणाला माहिती असेल, तर त्यांनी ती द्यावी. पण अवैध धंदे शिल्लक ठेवणार नाही.
- संजय बावीस्कर,
जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग