क्रीडा संकुलात पाणी सुविधेचा अभाव
By Admin | Updated: January 28, 2015 00:52 IST2015-01-27T22:33:04+5:302015-01-28T00:52:32+5:30
चिपळूण पालिका : प्रशासनाच्या सुस्त कारभाराने संताप

क्रीडा संकुलात पाणी सुविधेचा अभाव
चिपळूण : शहरातील अण्णासाहेब क्रीडा संकुलाची इमारत उभी राहून अंदाजे दीड वर्ष झाले, तरी या क्रीडा संकुलात पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. या क्रीडा संकुलामध्ये पाणी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे.
चिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे पूर्वीच्या गाढव मैदानावर लाखो रुपये खर्च करुन अण्णासाहेब क्रीडा संकुल उभारण्यात आले. विविध क्रीडाप्रेमींना हे क्रीडा संकुल खेळांसाठी उपलब्ध व्हावे, हा यामागचा हेतू असला तरी वीज जोडणी नसल्याने हे क्रीडा संकुल असून नसल्यासारखेच आहे. आता वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले असून, गेल्या महिन्यामध्ये लोकसभेच्या अध्यक्षा आणि चिपळूणच्या सुकन्या सुमित्रा महाजन यांचा चिपळूण नगर परिषद प्रशासन आणि लोकमान्य टिळक वाचनालयातर्फे सत्काराचा कार्यक्रमही घेण्यात आला. शहरात एकमेव असे हे क्रीडा संकुल असल्याने या मैदानामध्ये ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची संयोजकांतर्फे तयारी सुरु आहे.या स्पर्धेपूर्वी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होण्याची शक्यता गृहीत धरून त्यापूर्वी नगर प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. अण्णासाहेब खेडेकर क्रिडासंकुलाच्या उद्घाटनानंतर गेल्या वर्षभरात महत्वाच्या सुविधांकडे नगर पालिकेने लक्ष न दिल्यामुळे गैरसोय निर्माण झाली आहे. राज्य पातळीवरील स्पर्धेत येणाऱ्या खेळाडूंसाठी ही सुविधा असणे महत्वाचे मानले जात आहे. राज्याच्या विविध भागातून खेळाडू येथे येणार असून, या क्रीडा संकुलात अद्याप पाणी सुविधा उपलब्ध नसल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक इनायत मुकादम यांनी लक्ष वेधले आहे. या क्रीडा संकुलात पाणी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाने त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. (वार्ताहर)