तोंडवली, तळाशील वीज समस्येने त्रस्त
By Admin | Updated: February 26, 2015 00:20 IST2015-02-25T21:14:41+5:302015-02-26T00:20:22+5:30
आचरा वीज कार्यालयावर धडक : वीज अभियंत्यांचे पाहणीचे आश्वासन

तोंडवली, तळाशील वीज समस्येने त्रस्त
आचरा : तोंडवली-तळाशील भागात जीर्ण झालेल्या विद्युतवाहिन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वीज समस्या निर्माण होत होती. त्यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा करून वीज वितरण मंडळाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार तोंडवली-तळाशील भागात वीजवाहिन्या व खांब बदलण्याचे काम ठेकेदाराने चालू केले आहे. परंतु, प्रत्यक्षात फक्त खांब बदलून जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलल्याच जात नसल्याचे समजताच तोंडवली सरपंचांसह ग्रामस्थ जाब विचारण्यासाठी आचरा वीज वितरण कार्यालयात मंगळवारी दाखल झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी होत असलेल्या कामाची पाहणी करण्याची मागणी वीज वितरणचे अभियंता बोटलवार यांच्याकडे केली.
यावेळी तोंडवली सरपंच संजय केळुसकर, दिलीप पुजारे, सदानंद पाटील, दीपक कांदळकर, प्रशांत चोडणेकर, रवी पाटील उपस्थित होते. यावेळी सरपंच केळुसकर म्हणाले की, प्रत्यक्षात ग्रामस्थांनी मागणी केलेले काम होत नसून ठेकेदार आपल्या मर्जीने काम करत आहे. विद्युत
पुरवठा सुरळीत होत नसल्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसत
आहे.
यावेळी सरपंच यांनी खांब बदलण्याचे काम निकृष्ट असून, प्रत्यक्षात वायर कंडक्टर बदलले जात नसून अभियंत्यांनी पाहणी करावी व ग्रामस्थांच्या मागणीनुसार वायर जोडणीचे काम कराव;े अन्यथा काम होऊ न देण्याचा इशारा दिला.
यावेळी वीज वितरणचे अधिकारी बोटलवार यांनी अभियंता व वायरमन यांना पाठवून ग्रामस्थांच्या माणगीनुसार काम करून घेण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)
वायरमनचा मनमानी कारभार
वीज समस्येबाबत व्यथा मांडताना ग्रामस्थ दिलीप पुजारे म्हणाले, आज तोंडवली गावच्या ट्रान्स्फॉर्मरचा फ्यूज गेला तर पूर्ण रात्र अंधारात घालवावी लागत आहे. वायरमनशी संपर्क साधला तर उडवाउडवीची उत्तरे देतात. ग्रामस्थ जीव धोक्यात घालून फ्यूज स्वत: घालतात. उद्या त्यांचे बरेवाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल केला. ट्रान्स्फॉर्मरच्या खाली असणारी संरक्षक पेटी पूर्ण जीर्ण झाली असून, एखाद्या छोट्या मुलाच्या हाती लागेल अशी पेटी बसवलेली आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात धोका संभवतो. मीटर जोडणीसाठी अथवा कनेक्शन जोडणीच्यावेळी वायरमन ग्रामस्थांना वेठीस धरत आहेत.