कुडाळ नगरपंचायत निवडणूक अर्ज न भरण्यासाठी दबाव
By Admin | Updated: March 20, 2016 23:49 IST2016-03-20T22:26:35+5:302016-03-20T23:49:09+5:30
कॉँग्रेसचा उमेदवार रुग्णालयात : भाजपच्या पदाधिकाऱ्याबाबत चर्चा

कुडाळ नगरपंचायत निवडणूक अर्ज न भरण्यासाठी दबाव
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक आठमधून इच्छुक असलेल्या एजाज नाईक यांना काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज न भरण्याबाबतचा फोन विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्याने केल्याने नाईक यांची प्रकृती खालावली. त्यांना कुडाळातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हा फोन भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, उपचार घेत असलेल्या एजाज नाईक यांची भेट आमदार नीतेश राणे यांनी घेत त्यांची विचारपूस केली.
कुडाळ नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १७ एप्रिलला निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ सर्व राजकीय पक्ष, तसेच इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये उडाली आहे. प्रभाग क्रमांक आठ मस्जीद मोहल्लामधून एजाज नाईक हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून शनिवारी मुलाखतीसाठी गेलेल्या एजाज नाईक यांना भाजपने उमेदवारी न भरण्याबाबत सुनावले. यामुळे नाईक यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कुडाळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)
‘भाजप’कडून आला फोन?
एजाज नाईक यांना आलेला हा फोन भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आल्याची चर्चा कुडाळ शहरातील राजकीय वर्तुळात रंगली होती.
कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षातील प्रमुख मंडळींना उमेदवारीबाबत निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. निवडणुकीबाबतच्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच शनिवारी भाजप पदाधिकाऱ्याच्या या फोनमुळे नाईक अस्वस्थ झाल्याने कुडाळातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.