कोकणचा चैतन्य गणेशोत्सव
By Admin | Updated: August 24, 2016 23:47 IST2016-08-24T21:44:18+5:302016-08-24T23:47:23+5:30
समृद्ध परंपरा : दीड दिवसांपासून ४२ दिवसांचा सण; घरे बनतात मंगलमय मंदिरे--आले गणराया$$्

कोकणचा चैतन्य गणेशोत्सव
राजन वर्र्धन -- सावंतवाडी --मनमोहक डोंगरदऱ्यांसह हिरवाईने नटलेले आणि मायपूर्ण माणुसकीने सजलेले ठिकाण म्हणून कोकण क्षेत्राची ओळख आहे. पर्यटनाच्या माध्यमातून इथे येणाऱ्या प्रत्येकाला कोकणाची आवड लागावयास कारणीभूत असणारी गोष्ट म्हणजे इथले सौदाहार्यपूर्ण व आत्मीयतापूर्वक बोलणे. विज्ञानतंत्रज्ञानाच्या युगात आजही अनेक वाईट गोष्टींपासून अलिप्त राहत आपल्या संस्कृती देवाप्रमाणे जोपासणारे कोकणवासीय म्हणूनच देशभरासह आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या मनात घर करून आहेत. कोकणक्षेत्राची आणखी एक खासियत म्हणजे इथे साजरा होणारा गणेशोत्सव.
देशभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पण, कोकणात मात्र गणेशोत्सवाला दिवाळीपेक्षाही अनमोल महत्त्व देऊन साजरा करण्यात येतो. सणांचा राजा म्हणूनच अत्युच्च उत्साहात आणि चैतन्यात हा उत्सव साजरा केला जातो. इथली गणेशोत्सवाची परंपरा हीसुद्धा कोकणच्या संस्कृतीचा मुख्य गाभा बनून आहे. त्यामुळे इथल्या गणेशोत्सवाची तयारी दोन ते तीन महिन्यांपासून केली जाते. नोकरदार चाकरमान्यांचे सुटीचे नियोजन, प्रवासाचे नियोजन तर सहा महिन्यांपासूनच करण्यात येते.
कोकणातील गणेशोत्सव पाहिला, तर तो भक्तिभावाने आदरपूर्वक साजरा केला जातो. या उत्सवाला परंपरेची असणारी जोड इथे कायमच पाहावयास मिळते. त्यामुळेच दीड दिवसांपासून पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अकरा दिवस, पंधरा दिवस, सतरा दिवस, एकोणीस दिवस, एकवीस दिवसापांसून ते चक्क बेचाळीस दिवसांपर्यंत इथला गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्यामुळे या दिवसांत वर्षाच्या अंतराने गावी येणारे चाकरमानी गाव गजबजून सोडतात. वर्षभर रिकामी असणारी किंबहुना बंद असणारी घरे गणेशोत्सवात मात्र ‘भरभरून’ जातात आणि आणि घराघरांत चैतन्य संचारून ‘घरपण’ येत असते.
‘अतिथी देवो भव’ची प्रचिती
कोकणवासीयांचा मनमुराद आनंदाचा गणेशोत्सवाची अविट गोडी गणेशाच्या कालावधीत आहारातूनही दिसत असते. यावेळी घराघरांत गोडधोड चविष्ट पदार्थांची निर्मिती सुरू असते. यामध्ये मोदक साधे व उकडीचे, लाडू, पातोळे म्हणजे उकडीच्या करंज्या, आदींमुळे घराच्या गोडीला आणखी चवदार केले जाते. शिवाय पाच प्रकारच्या रानभाज्या करून खिरीसह नैवेद्य दाखविला जातो. यादिवशी पै पाहुणे, मित्रमंडळी आणि आप्तेष्टांना गणेशदर्शनाला बोलावून त्यांना जेवू-खाऊ घालण्याची परंपरा आहे. गणेशोत्सव काळात हा आहार केळीच्या पानावर दिला जातो. कोकणाची ही आदरातिथ्याची परंपरा भारतीय संस्कृतीच्या ‘अतिथी देवो भव’ चालीची प्रचिती आणणारी आहे.
लगबग सुरू
एकंदरीत लहानांपासून थोरामोठ्यांंमध्ये उत्साहाचे उधाण आणणारा सण म्हणून कोकणातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत गौरविलेल्या अनेक परंपरांपैकी गणेशोत्सवाच्या परंपरेला असणारे अनन्यसाधारण स्थान प्राप्त करून देण्यात कोकणाचा किंबहुना कोकणवासीयांचा अनमोल वाटा आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवही त्यादृष्टीने साजरा करण्याची लगबग सुरू आहे.
शाळांनाही आठ दिवस सुटी
कोकणात गणेशोत्सव काळात घरोघरी भजनांचे केलेले नियोजनही आत्मीयतेचा भाग बनून आहे. प्रत्येकाच्या घरी अर्धा तास तरी भजन म्हटल्याशिवाय गणेशाचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा होत नसल्याची भावना इथल्या भाविकांची आहे. काही ठिकाणी डबलबारी, २०-२० भजनांचेही आयोजन केले जाते. याशिवाय या काळात देखाव्यांच्या निर्मितीतून सामाजिक प्रबोधन करीत संस्कृती टिकविण्यावर भर दिला जातो. महिलांचा फुगडी कार्यक्रमही गल्लोगल्लीत रंगलेला पाहावयास मिळत असतो. तर शालेय मुलांना या काळात दिलेल्या आठ दिवसांची सुटीचा पायाही कोकणवासीयांनीच रोवला आहे.