कोकण झोनमध्ये वर्षभरात २१ फिडर्सची वाढ
By Admin | Updated: September 15, 2014 23:22 IST2014-09-15T22:40:22+5:302014-09-15T23:22:32+5:30
महावितरण कंपनी : अ ते ड गटात फिडर्सची वर्गवारी

कोकण झोनमध्ये वर्षभरात २१ फिडर्सची वाढ
रत्नागिरी : कोकण झोनमध्ये वर्षभरात महावितरणच्या २१ फिडर्सची वाढ झाली आहे. गतवर्षीपर्यंत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१ फिडर्स होते. सध्या त्यांची संख्या २२२ इतकी झाली आहे. मात्र, सर्वच्या सर्व फिडर्सची वर्गवारी ‘अ’ ते ‘ड’ गटात असून, अद्याप भारनियमनाचा धोका टळला आहे.
महावितरणकडून गेली दोन वर्षे फिडरनिहाय भारनियमन सुरू आहे. ज्या फिडर्सवर वीज गळती अधिक शिवाय आर्थिक वसुली कमी आहे, त्या फिडर्सची अ ते ग-३ पर्यंत वर्गवारी करण्यात आली आहे. या गटाप्रमाणे निश्चित तासांचे भारनियमन सुरू
आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अ, ब, क, ड गटात फिडर्सची वर्गवारी करण्यात आली आहे. मार्च २0१३ मध्ये एकूण २०१ फिडर्स होते, त्यामध्ये गेल्या दीड वर्षात २१ फिडर्सची भर पडली आहे. त्यामुळे २२२ इतकी फिडर्सची संख्या झाली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७९ फिडर्स ‘अ’ गटात आहेत. ७१ फिडर्स ‘ब’ गटात, ६१ फिडर्स ‘क’ गटात, तसेच ११ फिडर्स ‘ड’ गटात आहेत. ‘ड’ गटातील फिडर्सची संख्या अल्प आहे.
इ गटापासून भारनियन करण्यात येत आहे. मात्र, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फिडर्स भारनियमनापासून अलिप्त आहेत. त्यामुळे कोकण विभागाचा ठोका तात्पुरता टळला आहे.
महावितरणच्या फिडर्सनिहाय भारनियमनाला ग्राहकांचाही प्रतिसाद चांगला लाभत आहे. शिवाय महावितरणकडून वीज गळती रोखण्यासाठी विशेष भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. फिडर्सनिहाय आढावा घेऊन वीज गळती, चोरी शोधण्यात येते. शिवाय संबंधित ग्राहकांकडून दंडही वसूल करण्यात येतो. त्याचप्रमाणे ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठीही पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकूणच महावितरणने फिडर्सनिहाय वर्गवारी केल्याने ग्राहकांनाही त्यापासून दिलासा मिळाला आहे. सरसकट होणाऱ्या भारनियमनातून मुक्त झाले आहेत. नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना सरसकट भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत होता. परंतु फिडर्सनिहाय भारनियमनामुळे ग्राहक सुखावले आहेत. (प्रतिनिधी)