कोकण रेल्वे ‘रामभरोसे’च
By Admin | Updated: November 11, 2014 23:19 IST2014-11-11T22:07:50+5:302014-11-11T23:19:38+5:30
सुरक्षेची हमी नाही : ‘लोकमत’ने दिले होते सात दिवसांपूर्वीच संकेत

कोकण रेल्वे ‘रामभरोसे’च
रजनीकांत कदम - कु डाळ -वारंवार पटरी सोडून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या सतत अपघात होण्याच्या कारणांबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने वेळीच सतर्क व्हावे, असे सावधानतेचे आणि जागृकतेचे वृत्त अवघ्या सात दिवसांपूर्वी येऊनही कोकण रेल्वे प्रशासन अजूनही प्रवाशांच्या सुरक्षेच्यासंदर्भात गंभीर नसल्याचे निदर्शनास येत आहे. या कारभारामुळे कोकणकन्या एक्स्प्रेस नुकतीच एका मोठ्या अपघातापासून वाचली. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा सध्यातरी ‘रामभरोसे’ असून मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशांमधून केला जात आहे.
१ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेने सर्व गाड्यांचा वेग वाढविला आहे. गेल्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या मार्गावरील पाच रेल्वे अपघात पटरीवरून ट्रेन घसरल्यामुळे झाले. यापैकी चार मालगाड्या होत्या. तर एक सावंतवाडी-दिवा पॅसेंजर होती. या पाच अपघातात सुमारे १८ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. तर अनेक प्रवाशांना रेल्वे खोळंबल्याने त्रास सहन करावा लागला. तसेच रेल्वे पटऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली.
प्रशासनामध्ये गांभीर्य नाही
कोकण रेल्वे मार्गावरून रेल्वे का घसरतात, याबाबत कोकण रेल्वे प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे. ३ नोव्हेंबर रोजी रेल्वे सुरक्षेसंदर्भात उपाययोजना न केल्यास प्रवास धोक्याचा होण्याच्या इशाऱ्याचे वृत्त ‘लोकमत’ मधून प्रसिद्ध झाले होते. मात्र, याला सात दिवस होत नाहीत, तोपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील लाजूळ आणि करबुडे बोगदा दरम्यान रेल्वेच्या रुळाला चार इंच तडा गेल्याचे निदर्शनास आले. दैव बलवत्तर म्हणून ट्रॅकमॅन सचिन पाडावे यांच्या सकाळी साडेसातच्या सुमारास ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी काही वेळातच तिथून जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसला त्या ठिकाणाहून अवघ्या ३०० मीटर अंतरावर थांबवून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले. सुदैवाने हा अपघात टळला असला, तरी कोकण रेल्वे प्रशासनाने अजूनही प्रवाशांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार केला नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जनतेला रेल्वे मंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा
योगायोगाने कोकण भूमीचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू सध्या देशाचे रेल्वेमंत्री झाले आहेत. त्या अगोदरचे रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांनी रेल्वेचे स्वप्न साकार केले. आता कोकण रेल्वेच्या सुरक्षेकरिता व प्रवाशांच्या निर्धोक, सुखकर प्रवासाकरिता रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडून कोकणवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. निदान आता तरी कोकण रेल्वेला चांगले दिवस येतील अशी आशा कोकणातील जनता बाळगून आहे. प्रत्यक्षात त्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागणार आहे.
अपघाताची भीती
गेल्या काही महिन्यात कोकण रेल्वेला पाच अपघात झाले. तर हा सहावा अपघात सुदैवाने टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तरी रेल्वे प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रवाशांच्या मनात अपघाताबाबत भीती निर्माण झाली आहे.
अनेक आव्हाने पेलून, दरीडोंगर, नद्यानाले ओलांडून, भुयार पार करून आलेल्या कोकण रेल्वेला आतापर्यंत निसर्गाने साथ दिलेली आहे.
परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहेत. जेणेकरून प्रवाशांच्या मनातील भीती दूर होईल.