कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल
By Admin | Updated: August 24, 2014 22:35 IST2014-08-24T22:13:30+5:302014-08-24T22:35:18+5:30
प्रवाशांना अपघाताची माहिती न दिल्याने संताप

कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वीर ते करंजाडी स्थानकादरम्यान मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे ७ डबे रुळावरून घसरले. आज (रविवार) सकाळी ६.३० वाजता हा अपघात झाला. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली असून रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल या स्थानकांवर अनेक रेल्वेगाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. घसरलेले डबे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून, मार्ग मोकळा करण्यासाठी शेकडो कामगार कार्यरत आहेत. या अपघातामुळे मार्गावरील आज धावणाऱ्या १४ रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर लांब पल्ल्याच्या सात एक्सप्रेस गाड्या अन्य मार्गे वळविण्यात आल्या.
ऐन गणेशोत्सव काळातील या अपघातामुळे खळबळ माजली असून, मार्ग तातडीने मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कोकण रेल्वे व्यवस्थापनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रायगड विभागात पॅसेंजर ट्रेनचा मोठा अपघात झाला होता. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही कोकण रेल्वेने मार्ग योग्य राखण्याबाबत दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. या अपघातामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकात संपर्कक्रांती, मंगलासह तीन गाड्या सकाळी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांतील प्रवाशांना गाड्या का थांबविल्या हे सकाळी १० वाजेपर्यंत सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या या वागणुकीबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. १२६१९-मत्स्यगंधा एक्स्प्रेसेच्या वेळेत बदल करण्यात आला असून ही रेल्वे२४ रोजी दुपारी ३.२० वाजताऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून २५ रोजी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे. म्हणजेच ही रेल्वे ९ तास २० मिनिटांनी उशिराने सुटणार आहे. (प्रतिनिधी)
प्रवाशांना अपघाताची माहिती न दिल्याने संताप
रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी सकाळी साडेसहा वाजता उक्षीच्या पुढील भोके स्थानकावर उभी करून ठेवण्यात आली. प्रथम प्रवाशांना काहीही कारण सांगितले जात नव्हते. नंतर ही गाडी मुंबईला जाण्याऐवजी पुन्हा रत्नागिरी स्थानकाकडे आणून रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. वेळीच माहिती न देण्याच्या रेल्वेच्या वृत्तीचा अनेकांनी निषेध केला.