जलवाहतुकीसाठी कोकण - विकास आघाडीचे साकडे
By Admin | Updated: July 28, 2014 23:14 IST2014-07-28T22:04:39+5:302014-07-28T23:14:24+5:30
गणपत चव्हाण - महामार्गाच्या समुद्रकिनारी सुमारे ४० लाख कोकण वस्ती

जलवाहतुकीसाठी कोकण - विकास आघाडीचे साकडे
कणकवली : मुंबई-गोवा या महामार्गाचे चौपदरीकरण करावे, पश्चिम किनारी सागरी महामार्ग पूलासहित पूर्ण करावा आणि कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर जलवाहतुक सुरू करावी या प्रमुख तीन मागण्यांचे निवेदन कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी केंद्रीय सार्वजनिक दळणवळण-जलवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना सादर केले आहे. अशी माहिती कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली.
मुंबई-गोवा या अरूंद महामार्गावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. वळणावळणाचा, चढउतार डोंगरघाट आणि ब्रिटीशकालीन अरूंद पुल यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांमुळे या महामार्गाची वाताहात झाली आहे, चिपळूणनजीकचा कशेडी घाट खूप धोकादायक झाला आहे. त्यामुळे या घाटाला पर्यायी मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे. राज्यातील पुणे-बेंगलोर मार्गामध्ये कात्रज घाट ते खंबाटकी घाट वगळण्यासाठी बोगदे तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कशेडी घाटाला पर्यायी बोगदा तयार करण्यात यावा. या पर्यायी मार्गामुळे गोव्यापर्यंतचे अंतर ६० किलोमीटर कमी होणार आहे. आता या महामार्गाला प्राधान्य देण्यात यावे, असे या निवेदनात म्हटले आहे. पश्चिम किनारी सागरी महामार्ग देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मागील लोकसभेत हे जाहीर करण्यात आले. मात्र या मार्गाचे बांधकाम संथगतीने चालले आहे. गेले २५ वर्षे या मार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या समुद्रकिनारी सुमारे ४० लाख कोकण वस्ती आहे. आगामी दहशतवादी हल्ले समुद्रमार्गे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी या मार्गाचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. कोकणाला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. गेली ३० वर्षे किनाऱ्यावरील प्रवासी बोट वाहतुक बंद आहे. जलवाहतुक सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)