A knowledge bridge should be set up between cities, rural areas to create a prosperous India: Anil Kakodkar | समृद्ध भारत निर्मितीसाठी शहरे , ग्रामीण भाग यांच्यात ज्ञान सेतू उभारावा : अनिल काकोडकर
समृद्ध भारत निर्मितीसाठी शहरे , ग्रामीण भाग यांच्यात ज्ञान सेतू उभारावा : अनिल काकोडकर

ठळक मुद्देसमृद्ध भारत निर्मितीसाठी शहरे , ग्रामीण भाग यांच्यात ज्ञान सेतू उभारावाकणकवलीत अनिल काकोडकर यांचे व्याख्यान

कणकवली : भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. त्यामुळे शहरे व ग्रामीण भाग यांच्यामध्ये ज्ञान सेतू उभारावा लागेल. असे झाले तर ग्रामीण भागाचाही सर्वांगीण विकास होईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने समृद्ध भारत निर्माण होईल. हे आव्हान आपल्याला आता एकत्रितपणे पेलावे लागेल. असे मत पदमविभूषण, संशोधक डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे व्यक्त केले.

सुरेश कोदे सायन्स फोरमच्यावतीने कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात सुरेश कोदे स्मृती व्याख्यानमाला रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ' प्रगत तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास' या विषयावर डॉ. अनिल काकोडकर बोलत होते. यावेळी डॉ. बाळ फोंडके, डॉ. निलेश कोदे, वामन पंडित, प्रसाद घाणेकर, अशोक करंबेळकर, सुषमा केणी, लक्ष्मण तेली, डॉ . मिलींद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. अनिल काकोडकर म्हणाले ,
भारत हा शेतीप्रधान देश होता. तो औद्योगिकरणाकडे वळू लागल्यावर ग्रामीण भागातील विकास खुंटला. त्यामुळे प्रगत देशांच्या तुलनेत येथील अर्थव्यवस्था मागे पडत गेली. याला अनेक कारणे होती. कालांतराने परिस्थिती बदलली. आता अमेरिकेसारख्या देशात भारतातील तरुणांचा दबदबा आहे. तिथे त्यांच्या कार्यकर्तुत्वाला वाव मिळाला आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाचे दरडोई उत्पन्न वाढले तर चांगले होईल. त्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला प्रयत्न करावे लागतील.

सध्याच्या ज्ञान युगात फार मोठ्या संधी भारता समोर उपलब्ध होण्यासारख्या आहेत. ज्ञान युगाच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगाचा आलेख चढता आहे. एखाद्या कुटुंबातील मुलगा अथवा मुलगी आयटी क्षेत्रात गेली तर त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारते. त्यामुळे मुलांनी शिकावे , ज्ञान आत्मसात करावे, तज्ज्ञ बनावे आणि सखोल अभ्यासानंतर समस्या मांडाव्यात. तसे झाले तर खऱ्या अर्थाने देशासमोरील समस्या सुटतील .
शिक्षणाचा केंद्र बिंदू ग्रामीण भागाकडे वळविला पाहिजे. ग्रामीण भागातही विद्यापीठे स्थापन झाली पाहिजेत. पण ग्रामीण भागात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात. ग्रामीण भागात विद्यापीठे निर्माण झाली तर स्थानिकांच्या मदतीतून त्यांना आवश्यक त्या विषयावर संशोधन होऊ शकेल. तज्ज्ञ मंडळी तिथे काम करतील आणि तंत्रज्ञान तिथे रुजेल. अर्थात या गोष्टी झपाट्याने होणार नाहीत. मात्र, सुरुवात आजच करावी लागेल तरच पुढील काळात यश मिळेल.

आपल्याला भारताच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन भारतीय घडवायचे आहेत.
ज्ञान युगात ज्या संधी उपलब्ध आहेत त्याचे सोने करायचे आहे. ग्रामीण भाग सक्षम करायचा आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था तसेच इतर घटकांचाही सहभाग महत्वाचा आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या अंगीभूत गुणांना नवीन तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर निश्चीतच प्रगती होईल. आपण स्वतःच्या हिमतीवर तंत्रज्ञानात वृद्धी करीत नाही . हा आपला दोष आहे. बाहेरून तंत्रज्ञान आणण्यापेक्षा आपले तंत्रज्ञान विकसित केले तर चांगलेच आहे. संस्था, महाविद्यालये, प्रयोगशाळा यांच्या माध्यमातून तंत्रज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शासकीय योजना आपण स्थानिक विकासासाठी वापरू शकतो. आपल्या देशातील विषमता कमी करतानाच समृद्धी आणता यायला हवी. तंत्रज्ञान असे असावे की त्यामुळे अर्थार्जन वाढेल. मात्र, विषमतेला वाव मिळणार नाही. असे झाले तर निश्चितच समृद्ध भारत घडू शकेल. त्यासाठी एकविचाराने , एकदिलाने , एकत्रितपणे विज्ञानप्रेमींनी प्रयत्न करावे . असे आवाहनही डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद घाणेकर यांनी केले. उपस्थित श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन डॉ. काकोडकर यांनी यावेळी शँकानिरसनही केले.

फोटो ओळ - कणकवली येथे रविवारी आयोजित व्याख्यानमालेत डॉ. अनिल काकोडकर यांनी ' प्रगत तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास' या विषयावर विचार प्रदर्शित केले.

Web Title: A knowledge bridge should be set up between cities, rural areas to create a prosperous India: Anil Kakodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.