महाराष्ट्राला खेळवतेय खंडाळा कॉलेजची वर्षा सावंत--यश रत्नकन्यांचे
By Admin | Updated: January 2, 2016 08:29 IST2016-01-01T21:55:24+5:302016-01-02T08:29:24+5:30
जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका

महाराष्ट्राला खेळवतेय खंडाळा कॉलेजची वर्षा सावंत--यश रत्नकन्यांचे
मेहरून नाकाडे -- रत्नागिरी -कनिष्ठ महाविद्यालयासाठी तीन ते साडेतीन किलोमीटरचे अंतर पायी तुडवत, ऊन - पावसातच नव्हे; तर कडाक्याच्या थंडीतही सरावासाठी मैदानावर वेळेवर उपस्थित राहणे हे जणू नित्याचे आहे. जीव ओतून खेळाचा सराव केला जात असल्यानेच वर्षा मोहन सावंत हिने आपला विशेष ठसा उमटवला आहे. खेळातील चमकदार कामगिरीमुळे सी. के.नायडू क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट खेळामुळेच वर्षा सध्या महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.
रत्नागिरी शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या संघाने जिल्हा पातळीवर नव्हे; तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी ग्रामीण भागातून येत असल्याने त्यांना लागणारे साहित्य व स्पर्धेसाठी जाण्या-येण्याचा लागणारा सर्व खर्च संस्थेने उचलला आहे. मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन या मुलींचे मनोबल उंचावते.
वाटद मिरवणे केंद्रशाळेत वर्षाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक विद्यालय, वरवडे येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. आई मनीषा सावंत, वडील मोहन देमाजी सावंत शेतकरी असून, घराची परिस्थिती बेताची, घरातून कोणतेही मार्गदर्शन नसताना क्रिकेटची आवड राजेश जाधव व अर्चना खानविलकर यांच्यामुळे निर्माण झाली. खेड्यातील खेळाडू असतानाही खेळातील बारकावे, छोट्या मोठ्या टीप्स राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी कशा उपयोगी पडतील, याबाबतची माहिती राजेश जाधव व अर्चना खानविलकर करतात. शिक्षकांवर पालकांचा विश्वास असल्यामुळे मुलींना स्पर्धेकरिता पाठवतात. आपली मुलगी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याचा वर्षाच्या वडिलांना अभिमान आहे.
खेळताना खेळाडूचे लक्ष विजयाकडेच असते, किंबहुना ते असावे लागते. त्याप्रमाणे वर्षादेखील एकाग्र होऊन खेळ सादर करते. बेस्ट विकेट किपर (यष्टीरक्षक), उत्कृष्ट बॅट्समन, हाय स्कोर करून विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये तिने यश संपादन केले आहे. सामान्य शेतकऱ्याची मुलगी असल्याने तिला अन्य खेळाडूंप्रमाणे फिटनेससाठी व्यायाम, खाणे याकडे फारसे प्राधान्य देणे शक्य नाही. घरातून बांधून दिलेला भाजीपोळीचा डबा शिवाय दररोज महाविद्यालयासाठी करावी लागणारी पायपीट या तिच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मात्र, तिच्यातील आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचे काम शाळेचे शिक्षक, संस्थाचालक करत आहेत.वर्षाप्रमाणेच या कनिष्ठ महाविद्यालयीन मुलींच्या संघाने क्रिकेटमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.
या विद्यार्थिनींना राष्ट्रीय विशेष कोचच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या या संघाला चांगले प्रायोजक लाभले तर हा राष्ट्रीयस्तरावरील यशही खेचून आणण्याची ताकद या संघात आहे. परिस्थितीअभावी अनेक विद्यार्थिनींना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते किंबहुना खेळही सुटतो. परिणामी या विद्यार्थिनींचे नुकसान होते. या विद्यार्थिनींचा खेळातील सहभाग व यश राहिले तर नक्कीच त्यांची परिस्थिती बदलू शकते.
विविध स्पर्धा
सी. के.नायडू क्रिकेट स्पर्धा
टेनिस बॉल क्रिकेट
विविध शहरातील खेळ
कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, पंजाब, दिल्ली, फिरोजाबाद, गुजरात, मथुरा, राजकोट, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, अमरावती.
खेळातील यश
बेस्ट विकेटकिपर (यष्टीरक्षक),
उत्कृष्ट बॅट्समन
हाय स्कोर
क्रिकेट हाच श्वास
खंडाळाहायस्कूल आणि महाविद्यालयात क्रिकेट शिकवणीसाठी क्रीडाशिक्षक राजेश जाधव आणि अर्चना खानविलकर मेहनत घेतात. ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू घडवण्याचे काम येथे सुरु आहे. अनेक समस्या पाचवीला पूजलेल्या असतानाही ज्ञानदाता गुरु आणि ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थिनी दोन्हीही कसोटीला उतरून क्रिकेट खेळतात. जणू क्रिकेट हाच त्यांचा श्वास आहे.