खाकीचा ‘मास्टर प्लॅन’ यशस्वी
By Admin | Updated: October 1, 2015 00:28 IST2015-09-30T23:03:47+5:302015-10-01T00:28:18+5:30
गणेशोत्सव शांततेत : वाहतूक कोंडी रोखण्यात यश

खाकीचा ‘मास्टर प्लॅन’ यशस्वी
सिद्धेश आचरेकर - मालवण -गणेशोत्सव कालावधीत मालवण शहरात वाहतुकीची कोंडी काही नवीन नाही. बाजारपेठेतील अरुंद रस्ते तर पोलीस प्रशासनाची नेहमीच डोकेदुखी ठरतेय. मात्र, यावर्षी पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आखलेला वाहतूक नियोजनाचा मास्टर प्लॅन यशस्वी ठरला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे मालवणवासीयांतून कौतुक होत आहे. वाढते पर्यटन आणि गणेशोत्सवात असलेली भाविकांची वर्दळ लक्षात घेता मालवण पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष कंबर कसली होती. पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी शांतता समितीच्या बैठकीत वाहतूक कोंडीचा मास्टर प्लॅन आखल्याचे स्पष्ट केले होते. यावरून १७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या गणेशोत्सवात यंदाच्या वर्षी वाहतूक शाखेच्या पोलिसांवर वाहतुकीचा ताण कमीच होता तसेच शहरात पोलिसांच्या गाडीची गस्त सुरूच होती. तालुक्यात अकरा दिवसाच्या कालावधीचा गणेशोत्सव अतिशय शांततेत पार पडला. यंदाच्या वर्षी ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजे-डॉल्बीवर निर्बंध होते. न्यायालयाचे आदेश मालवणवासीयांनी पाळत पोलीस प्रशासनानेही सामंजस्याने अडचणीवर मात करत गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यास विशेष मेहनत घेतली. त्यामुळे यावर्षी वाहतूक कोंडी रोखण्यात आणि गणेशोत्सव शांत वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणेने घेतलेल्या परिश्रमाचे मालवणवासीयांना कौतुक वाटत आहे. याबाबत सोशल मीडियावरही पोलिसांच्या यशस्वी कामगिरीची स्तुती केली जात आहे.
चोख वाहनस्थळ व्यवस्था
दरवर्षी शहरात बाजारपेठ, भरड नाका, तारकर्ली नाका, देवूळवाडा, पेट्रोलपंप आदी ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही बाब लक्षात घेवून मालवण पोलिसांनी वाहतूक सुरळीत रहावी यासाठी मोक्याच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली होती. यात सागरी महामार्ग येथे खासगी बस, अवजड वाहने, ट्रक तसेच टोपीवाला हायस्कूल व नाट्यगृह येथे चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली तर बांगीवाडा येथे सहा आसनी रिक्षा, टेम्पो आदी वाहनांसाठी पार्किंगचे योग्य नियोजन करण्यात आले होते. तर बाजारपेठेत वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी काही मार्ग बंद तर काही मार्ग एकदिशा ठेवण्यात आले होते. तसेच बंदर जेटी येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, गणेशोत्सवात एसटी बसफेऱ्या बाजारपेठेतून पूर्णत: बंद होत्या. त्यामुळे बरीचशी वाहतूक कोंडी टळली.
गणेशोत्सव काळात मागील अकराही दिवस मालवण शहरातील वाहतुकीचे कौशल्यपूर्ण संयमित आणि जनसामान्यांना जास्तीतजास्त सोयिस्कर असे नियोजन केल्याबद्दल पोलीस निरीक्षक बुलबुले आणि त्यांचे सर्व सहकारी प्रशंसेस पात्र आहेत. विसर्जन मिरवणुकांतही न्यायालयाचे आदेश पाळताना पोलीस दलाने जे तारतम्य दाखवून सामंजस्याने अडचणीतून मार्ग काढीत उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण संपन्न होण्यासाठी खूपच उत्कृष्ट नियोजन केले. गतकाळच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या वर्तणुकीतील सकारात्मक आणि परिस्थिती हातळणीतील मानवीय परिवर्तनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच! अशाप्रकारे त्यांचे कौतुक केले तरच ते उत्स्फूर्तपणे काम करतील.
- नितीन वाळके, हॉटेल व्यावसायिक मालवण