खड्डे हे काँग्रेसचेच पाप
By Admin | Updated: September 10, 2016 00:37 IST2016-09-09T23:47:07+5:302016-09-10T00:37:32+5:30
अतुल काळसेकर : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भाजपने बुजविले

खड्डे हे काँग्रेसचेच पाप
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे हे काँग्रेस शासनाचेच पाप आहे. त्यांच्याच काळात महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आता ही स्थिती उद्भवली आहे. मात्र, असे असतानाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने फक्त बॅनरबाजी केली. खड्डे बुजविण्याच्या कामाचा पाठपुरावा केला नाही, अशी टीका करतानाच भाजपने या कामाचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देऊन गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवून भाविकांना दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे केले.
येथील भाजप संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतुल काळसेकर म्हणाले, काँग्रेस आघाडी शासनकाळात महामार्गाचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे होते. त्याला भाजप शासन जबाबदार असल्याचे सांगत काँग्रेसकडून बॅनरबाजी करीत टीका करण्यात आली होती. मात्र, बॅनरवर असलेले खड्डे हे महामार्गावरील नव्हते.
भाजपने या खड्ड्यांबाबत पाठपुरावा केला. तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले. त्यांनी कोकणात प्रथमच मोहीम हाती घेऊन गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
अधिकाऱ्यांनीही कार्यतत्परता दाखवत गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवून भाविकांना दिलासा दिला आहे. अधिकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे.
१२ आॅगस्ट रोजी मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मागणीनुसार बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदी नेते यावेळी उपस्थित होते. या बैठकीत महामार्गाच्या सद्य:स्थितीबाबत मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी मंत्री पाटील यांनी २५ आॅगस्टपर्यंत महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते.
मात्र, जोरदार पाऊस पडत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचे काम अपूर्ण राहिले होते. महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी चार टप्पे करण्यात आले होते. त्यातील जानवली पूल ते झाराप तिठा या टप्प्याच्या कामावर देखरख ठेवण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती. तेथील कामाचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून २९ आॅगस्ट रोजी मी तो मंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केला होता. त्यामुळे ३0 आॅगस्ट रोजी अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी माहिती व प्रत्यक्ष स्थिती याबाबत मंत्र्यांना ताळमेळ घालता आला.
त्यानंतर अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या सूचनांनुसार काम करून खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे भाविकांचा त्रास कमी झाला, असेही अतुल काळसेकर यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
महामार्गावर कारपेट करण्याची मागणी !
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी १८000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा मार्ग होण्यासाठी दोन वर्षे निश्चितच लागणार आहेत. त्यामुळे या कालावधीपूर्वी या रस्त्यावर डांबराचे कारपेट करण्यात यावे, अशी मागणी आम्ही सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडे केली आहे. या मागणीला त्यांनी तत्वत: मान्यता दिली असल्याचे अतुल काळसेकर यांनी यावेळी सांगितले.