सावंतवाडीत केसरकरांचे वर्चस्व
By Admin | Updated: October 19, 2014 22:26 IST2014-10-19T21:59:37+5:302014-10-19T22:26:05+5:30
शिवसेना कार्यकर्त्यांनी केला विजयोत्सव

सावंतवाडीत केसरकरांचे वर्चस्व
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी तब्बल ४१ हजार १९२ मतांचे मताधिक्य मिळवित दणदणीत विजय मिळविला. दीपक केसरकर यांनी विक्रमी ७0 हजार ९0२ मते मिळविली. या मदरासंघात भाजपाचे राजन तेली हे २९ हजार ७१0 मते मिळवून दुसऱ्या स्थानावर तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत गावडे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. या मतदारसंघात पंतप्रधान मोदी व काँग्रेस नेते नारायण राणे यापैकी कोणाचाच प्रभाव दिसला नाही. केसरकरांना विजयी घोषित केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
येथील जिमखाना मैदानावर सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. मतमोजणीच्या एकूण २२ फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीपासूनच सेनेचे दीपक केसरकर हे आघाडीवर राहिले. पाचव्या फेरीनंतर दीपक केसरकर यांचे मताधिक्य वाढल्याने भाजपाचे राजन तेली यांनी मतमोजणी कक्षातून बाहेर जाणे पसंत केले. तर त्यानंतर सुरेश दळवीही कक्षातून बाहेर पडले. त्यानंतर काँग्रेसचे चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दहाव्या फेरीनंतर कक्षाबाहेर पडले. पहिल्या टप्प्यात वेंगुर्ले तालुक्याची मतमोजणी करण्यात आली.
वेंगुर्ले तालुक्यात केसरकर यांनी २३ हजार ९५९ मते मिळविली. तालुक्यात दुसऱ्या स्थानी राहिलेल्या भाजपाच्या राजन तेली यांनी ८ हजार ३९१ मते मिळविली. काँग्रेसचे बाळा गावडे यांनी ७ हजार ८४४, मनसेच्या उपरकरांना यांना १ हजार ९0४ तर राष्ट्रवादीचे सुरेश दळवी यांना केवळ १ हजार ३५२ मते मिळाली. सावंतवाडी तालुक्यात केसरकर यांनी सर्वाधिक ३८ हजार ६९३ मते मिळविली. तेली यांनी १४ हजार ५९३, गावडे यांनी १४ हजार ६३१, दळवी यांनी २ हजार ७३५ तर उपरकर यांनी ३ हजार ९४ मते मिळविली. दोडामार्ग तालुक्यातही केसरकरांनी मताधिक्य कायम राखले. याठिकाणी त्यांनी ६ हजार ६७५ मते मिळविली. राजन तेली यांनी ४ हजार ९३५, बाळा गावडे यांनी १ हजार ९४0, परशुराम उपरकर यांना केवळ ८२७ मते तर स्थानिक उमेदवार असलेल्या सुरेश दळवी यांना केवळ ३ हजार ६३४ मते मिळाली. या निवडणुकीत १ हजार ५१५ मतदारांनी वरील उमेदवारांना नकाराधिकार मतदान केले. ५४१ पोस्टल मतांपैकी दीपक केसरकर यांना ३७0 मते मिळाली. केसरकरांनी १८ व्या फेरीअखेर मतमोजणी कक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचासोबत त्यांच्या पत्नी पल्लवी, मुलगी सोनाली उपस्थित होती. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी त्यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले. केसरकर यांच्या विजयानंतर सावंतवाडी शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढत विजयोत्सव साजरा केला.
कोणत्या कारणामुळे
पक्ष जिंकला
दीपक केसरकरांनी स्वच्छ चारित्र्य व नम्रतेच्या जोरावर वेगळी प्रतिमा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निर्माण केली. कठीण प्रसंगात कार्यकर्त्यांना साथ दिल्याने त्यांना मताधिक्य मिळविणे सोपे झाले.
सावंतवाडी मतदारसंघात पंचरंगी निवडणूक झाली. राष्ट्रवादीचे सुरेश दळवी वगळता इतर उमेदवार मतदार संघाबाहेरील आयात उमेदवार होते. परिणामत: मतदारांचा कल स्थानिक उमेदवाराकडेच असल्याने याचा फायदाही केसरकरांना झाला व त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला.
दीपक केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सेनेची ताकद या मतदारसंघात वाढली. परंतु त्याचबरोबर सेनेच्या भगव्या झेंड्याखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज केसकरांना मिळाली. त्यांचे काही सहकारी सोडून गेले असताना सेनेचे कार्यकर्ते जोमाने प्रचारात उरतले आणि सेनेची पारंपरिक मतेही त्यांनी मिळविली.
ठळक वैशिष्ट्ये
सावंतवाडीतील मतदारसंघात निवडणुकीआधी झालेली पक्षांतरे ही केसरकरांसाठी जमेची बाजू ठरली.
केसरकरांसोबत शिवसेनेत दाखल झालेले सुरेश दळवी यांना राष्ट्रवादीने तिकीटाचे आमिष दाखवत फोडले.