केसरकरांची वाटचाल स्वार्थासाठीच

By Admin | Updated: August 7, 2014 00:17 IST2014-08-06T22:58:05+5:302014-08-07T00:17:29+5:30

परशुराम उपरकर : नारायण राणेंवरही केली टीका

Kesarkar's path is for selfishness | केसरकरांची वाटचाल स्वार्थासाठीच

केसरकरांची वाटचाल स्वार्थासाठीच

कणकवली : नारायण राणे यांनी केलेले बंड थंड झाले आहे. केवळ दोन्ही मुलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दीपक केसरकर हे दहशतवादाच्या मुद्याचे राजकारण करण्याबरोबरच जनतेची दिशाभूल करीत आहेत. या दोन्ही नेत्यांची राजकीय वाटचाल ही वैयक्तिक स्वार्थासाठी सुरु असल्याची टीका मनसेचे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
येथील संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात सन २००५ पासून दहशतवाद सुरु झाला आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले संदेश पारकर यांना मारहाण झाली होती. तर उमेश कोरगांवकर यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला होता.
या दोन्ही हल्ल्यानंतर दीपक केसरकर दोघांचीही विचारपूस करण्यासाठी गेलेले नाहीत. त्यांनी असे केले असते तर नारायण राणेंचा रोष त्यांनी ओढवून घेतला असता. त्यामुळेच केसरकर त्यावेळी शांत राहिले होते. सन २००५ च्या पोटनिवडणुकीत दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचा प्रचार केला होता. त्यावेळी राज्यभरातील शिवसैनिकांना सिंधुदुर्गात मारहाण होत होती. पण केसरकर हे सर्व उघड्या डोळ्यांनी पहात होते. आपले आमदारकीचे तिकीट निश्चित करण्यासाठी राणेंच्या केबिनमध्ये ते बसून होते. त्यावेळी त्यांना हा दहशतवाद दिसला नाही.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आतापर्यंत वैभव नाईक यांच्याबाबत शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेनेचे वैभव असा उल्लेख करीत होते. आता केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते वैभव नाईकांना विसरले आहेत. सावंतवाडीतील सभेत वैभव नाईक यांचा त्यांनी उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेत नव्याने दाखल होणाऱ्यांना डोक्यावर घेतले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. सावंतवाडीतील केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी राज्यभरातील शिवसैनिकांची गर्दी होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील तुरळक मंडळी यावेळी उपस्थित होती.
यावरून केसरकर यांचे पाठिराखे किती आहेत हेदेखील दिसून आले आहे. शिवसेनेत नव्याने दाखल झालेले माजी आमदार शंकर कांबळी हे काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी व आता पुन्हा शिवसेना असा प्रवास करीत आले आहेत. त्यांना उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधू का? असा प्रश्न विचारला. यावरून त्यांची किती पत घसरली आहे हे लक्षात येते, अशीही टीका उपरकर यांनी यावेळी
केली. (वार्ताहर)
केसरकरांनी खुनी माजी आमदाराचे नाव जाहीर करावे
शिवसेना प्रवेशाच्या सभेत माजी आमदार दीपक केसरकर यांनी भाषणात जिल्ह्यातील काही खुनाचे आरोप असलेले माजी आमदार उघडपणे फिरत असल्याचा उल्लेख केला होता. केसरकरांनी पडद्यामागून राजकारण न करता उघडपणे राजकारण करावे व खुनी आरोपातील आमदाराचे नाव जाहीर करावे, असे आव्हान माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले. परशुराम उपरकर सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना हे उघडपणे राजकारण करत असते. शिवसेनेत खोटे बोलून राजकारण चालत नाही. खोट्यानाट्या घटना सांगून लोकांची सहानुभूती मिळणार नाही, अशी टीका यावेळी उपरकर यांनी केली. माजी आमदारांमध्ये शिवराम दळवी, राजन तेली यांच्यासह माझाही समावेश होतो. त्यामुळे पडद्यामागून नाव घेण्यापेक्षा केसरकरांनी उघडपणे ‘त्या’ आमदाराचे नाव घ्यावे. शिवराम दळवी, उमेश कोरगावकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मंगळवारी केसरकर यांनी उल्लेख केला. मात्र, माझ्यावरील वेंगुर्ले येथे झालेल्या हल्ल्याचा त्यांनी उल्लेख का केला नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

Web Title: Kesarkar's path is for selfishness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.