केसरकरांनी आत्मपरीक्षण करावे
By Admin | Updated: October 30, 2015 22:38 IST2015-10-30T22:38:34+5:302015-10-30T22:38:34+5:30
भालेकरांचा सल्ला : बेताल वक्तव्ये करण्यापेक्षा कामावर लक्ष द्यावे

केसरकरांनी आत्मपरीक्षण करावे
खारेपाटण : ‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा पालकमंत्री केसरकरांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे’ असा सल्ला राष्ट्रीय कॉँग्रेस कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भालेकर यांनी दिला आहे. आपल्या एका वर्षाच्या कार्यकाळात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या पालकमंत्र्यांनी जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी राणे यांच्यावर केलेल्या टीकेला भालेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकरांनी अशी बेताल वक्तव्य करण्याऐवजी आपले काम शिकून घेण्याचा प्रयत्न करावा, असा टोला भालेकर यांनी लगावला आहे.
राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वाधिक कामे सिंधुदुर्गात झाली. देशातील पहिला सी-वर्ल्ड प्रकल्प पर्यटनवृद्धीच्या हेतूने आपल्या जिल्ह्यात खेचून आणला, चिपी विमानतळाचे काम सुरू केले, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी लावले. मात्र, आताचे पालकमंत्री सुडबुद्धीने वागत असून सी-वर्ल्ड प्रकल्प बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे.
राणे असताना या पदाला एक शोभा होती. एक वलय प्राप्त झाले होते. त्यांचा प्रशासनावर वचक होता. धाक होता. मात्र, या पालकमंत्र्यांना ‘मी पालकमंत्री बोलतोय’ अशी स्वत:ची ओळख अधिकारी व कर्मचारी यांना करून द्यावी लागते. याचा विचार अगोदर करावा. ज्या पक्षाच्या जिवावर त्यांना लाल दिवा मिळाला आहे, त्या पक्षातील कार्यकर्त्यांना जे वेळ देऊ शक त नाहीत. ते सिंधुदुर्गच्या जनतेला काय वेळ देणार. खुद्द शिवसेनेतील जुने-जाणते शिवसैनिक केसरकरांच्या कुटनीतीला वैतागले असून, अनेक शिवसैनिक त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून बंडाच्या पवित्र्यात आहेत. मंत्रिपदी बसून वर्षाचा काळ लोटत आल; परंतु केसरकरांना आपले दालन सोडावेसे वाटत नाही. ज्या गोरगरीब जनतेच्या मतांवर मंत्री बनले, त्यांना रस्ते, पाणी, आदी समस्या भेडसावत आहेत. हे केसरकरांना जिल्ह्यात आल्याशिवाय कसे जमणार. राणे कुटुंबावर नाहक टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम केसरकर जोरदार राबवत आहेत. मात्र, अशा कोणत्याही प्रकारची टीका राणेंचा सच्चा कार्यकर्ता सहन करणार नाही.
सत्तेत राहूनदेखील वेळप्रसंगी राणे साहेबांनी आंदोलने केली, ती फक्त जनतेच्या हितासाठीच, असे पालकमंत्री केसरकर करू शकतील काय? राणेसाहेबांच्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय स्वत: घेणाऱ्या पालकमंत्री केसरकरांचा डाव सिंधुदुर्गातील स्वाभिमानी जनतेने ओळखला आहे. जनताच त्यांना योग्यवेळी धडा शिकवेल. हे केसरकरांनी लक्षात ठेवावे, असे सडेतोड उत्तर भालेकर यांनी केसरकरांना दिले.
(वार्ताहर)