केसरकर हेच भावी पालकमंत्री विनायक राऊत यांचे सूतोवाच : कोकणच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करणार
By Admin | Updated: May 19, 2014 00:29 IST2014-05-19T00:28:49+5:302014-05-19T00:29:07+5:30
सावंतवाडी : भविष्यात कोकणच्या विकासाची ब्लू प्रिंट ठरविण्यासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञांची मदत घेणार आहे. विकास थांबविणार म्हणणार्या नारायण राणे यांनी कोकणचा कोणता विकास केला हे स्पष्ट करावे,

केसरकर हेच भावी पालकमंत्री विनायक राऊत यांचे सूतोवाच : कोकणच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करणार
सावंतवाडी : भविष्यात कोकणच्या विकासाची ब्लू प्रिंट ठरविण्यासाठी जिल्ह्यातील तज्ज्ञांची मदत घेणार आहे. विकास थांबविणार म्हणणार्या नारायण राणे यांनी कोकणचा कोणता विकास केला हे स्पष्ट करावे, असे सांगत आमदार दीपक केसरकर हे भविष्यातील सिंधुदुर्गचे पालकमंत्री असतील, असे सूतोवाच नूतन खासदार विनायक राऊत यांनी केले. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, संपर्कप्रमुख शैलेश परब, माजी आमदार सि. स. सावंत, मंगेश तळवणेकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, भाजपचे राजन म्हापसेकर, अनारोजीन लोबो, दत्ता घाटकर, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, आदी उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, मी चिंतामणराव देशमुख यांचे ‘मराठी बाणा’ पुस्तक वाचले होते, पण आधुनिक बाणा खर्या अर्थाने आमदार दीपक केसरकर यांनीच दाखविला असून, त्यांची दखल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. नारायण राणे यांनी दिलेला राजीनामा हा स्टंट आहे; पण आणखी तीन महिन्यानी त्यांना खरोखरच राजीनामा द्यावा लागेल आणि भविष्यातील पालकमंत्री दीपक केसरकर असतील, असे राऊत यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला प्रवाहाच्या विरोधात पोहायला सांगितले होते. आमदार दीपक केसरकर हे प्रवाहाच्या विरोधात पोहत गेले आणि त्यामुळेच ते किनार्याला पोहोचले, असे सांगत आता भगव्याची लाट विधानसभा निवडणुकीतही दिसेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. मायनिंग तसेच रेडी बंदर, आरोंदा जेटी, आदी दलालांचे प्रकल्प असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची प्रकिया आम्ही सुरू करणार आहोत. सिंधुदुर्गचा विकास व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे; पण पायाभूत सुविधाही आवश्यक आहेत, असे सांगून यापुढे रोजगारावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार विनायक राऊत यांचे आमदार केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी संदीप टोपले, नकुल पार्सेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, सुदन आरेकर, सोमकांत नाणोस्कर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)