केसरकर राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ करणार
By Admin | Updated: July 13, 2014 00:11 IST2014-07-13T00:11:27+5:302014-07-13T00:11:41+5:30
पंधरा दिवसांत घोषणा: कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचा पर्याय

केसरकर राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ करणार
सावंतवाडी : मी जनतेचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे माझा निर्णय आता जनताच घेईल. जनतेच्या मनात शिवसेनेत प्रवेश करावा, असे असेल, तर मी नक्कीच तसा निर्णय घेईन. मला पंधरा दिवसांचा वेळ द्या, असे सांगत आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्याला कार्यकर्त्यांनी तेवढाच प्रतिसाद देत आम्ही तुमच्या बरोबरच राहू, असे सांगितले.
केसरकर यांनी माडखोल येथील साई मंदिरात कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माजी आमदार पुष्पसेन सावंत, शंकर कांबळी, राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, नगराध्यक्ष बबन साळगावकर, अनारोजीन लोबो, अनुराधा देशपांडे उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, माझी लढाई दहशतवादाशी आहे. जर राष्ट्रवादी काँॅग्रेसचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याशी हातमिळवणी करणार असेल, तर मला माझा विचार करावाच लागेल. राष्ट्रवादीत थांबलो तरी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार नाही. आम्हाला स्वाभिमान आहे आणि तो कुठेही गहाण टाकणार नाही.
पुष्पसेन सावंत म्हणाले, तुम्ही कोणताही निर्णय घ्या; पण विचार करून घ्या. कोणतीही पायरी चढताना त्या पायरीचा निश्चितच विचार करा, असे स्पष्ट केले.
शंकर कांबळी यांनी पक्षाला आमची गरज नाही, अशा पक्षात थांबून काय करायचे? असा सवाल केला. कार्यकर्ते आपली शिदोरी आहे; पण नेत्यांना आमच्या लढाईची किंमतच नाही. त्यामुळे कार्यकर्ते जो निर्णय घेण्यास सांगतील तो निर्णय आम्ही घेऊ, असेही कांबळी म्हणाले. यावेळी त्यांनी दहशतवादाची लढाई सुरू ठेवू, असे सांगितले.
सुरेश दळवी यांनी आपले विचार मांडले. प्रकाश परब यांनी प्रास्ताविक केले. तर अशोक दळवी यांनी आभार मानले. यावेळी नगरसेविका अफरोझ राजगुरू, शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, शुभांगी सुकी, सुरेश शेट्ये, देवेंद्र टेमकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)