कोकणचे पाणी कोकणातच राहावे
By Admin | Updated: January 4, 2015 01:01 IST2015-01-04T00:58:52+5:302015-01-04T01:01:56+5:30
दीपक सावंत : कोकणच्या पाण्यावरून सेनेची कोपरखळी

कोकणचे पाणी कोकणातच राहावे
सावंतवाडी : कोकणचे पाणी पळविण्याचा प्रयत्न चालला आहे. मात्र, ती आमची नैसर्गिक देणगी आहे. कोकणातील पाणी कोकणातच राहिले पाहिजे, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कोकणचे पाणी मराठवाड्यात नेण्याची घोषणा केली होती. यावरून शिवसेनेने भाजपला कोकणच्या पाण्यावरून कोपरखळीच मारल्याची चर्चा सभागृहात होती.
राज्याचे आरोग्यमंत्री शनिवारी सावंतवाडीतील आयोजित करण्यात आलेल्या काजू व कोको विकास निर्देशालय, भारत सरकार व कृषी पणन विभागाच्यावतीने आयोजित सेंद्रिय महोत्सव व काजू उत्पादन प्रशिक्षण वर्गात उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सेंद्रिय शेती धोरण मंत्रालय अध्यक्ष डॉ. शंकरराव राऊत, कृषी विभागाचे सहसंचालक एस. एल. जाधव, सभापती प्रमोद सावंत, सुचिता वजराठकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, आर. जी. पाठक यावेळी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, कोकणात भरपूर काही होऊ शकते, पण आज राज्याच्या विचार करता सर्वच ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यावर उपाय होणे गरजेचे असून, राज्य सरकार त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
कोकणाला निसर्गाने बरेच काही दिले असून, कोकणला पाणी हे निसर्गाने दिले आहे. पण, ते आपण साठवून ठेवू शकत नाही. आता त्यावरही विचार होणे गरजेचे आहे. कोकणचे पाणी कोण तरी पळवण्याचा विचार करतात, त्यांना पाणी पळविण्यास देऊ नका. कोकणातील पाणी कोकणात राहायला द्या, असे आवाहन सावंत यांनी केले.
मध्यंतरी भाजपचे नेते तथा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी कोकणचे पाणी मराठवाड्याला नेण्याची संकल्पना मांडली होती. त्यावर शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी केलेली ही एकप्रकारची कोंडीच म्हणावी लागेल. कारण शिवसेना, भाजप हे राज्यात सत्तेत असून, कोकणच्या पाण्यावर मात्र वेगवेगळ्या भूमिका आहेत. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पेप्सी कंपनी सिंधुदुर्गमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असून योग्यप्रकारे त्यांना सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच शेतकरी माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श राहिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)