पाठिंब्यापेक्षा शांतता राखा

By Admin | Updated: July 16, 2015 22:57 IST2015-07-16T22:57:48+5:302015-07-16T22:57:48+5:30

निवतीतील घेराव : मत्स्य आयुक्तांचे मच्छिमार महिलांना आवाहन

Keep calm than support | पाठिंब्यापेक्षा शांतता राखा

पाठिंब्यापेक्षा शांतता राखा

मालवण : निवती येथे बुधवारी तब्बल सात तास पर्ससीन मच्छिमारांनी घेराव घातला ही बाब महिला अधिकारी म्हणून गंभीर आहे. तुमच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांच्या पाठिशी मालवण येथील महिला ठाम उभ्या राहतील अशी भूमिका शहरातील मच्छिमार महिला व महिला लोकप्रतिनिधींनी सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांची भेट घेत मांडली. जिल्ह्यातील सर्व मच्छिमार बांधव हे आपल्यासाठी एक आहेत. मला कोणाचा पाठिंबा नको त्यापेक्षा तुम्हा सर्वांचे सहकार्य मिळाल्यास जिल्ह्यात मच्छिमार वर्गात शांतता राखण्यास बळ मिळेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.दरम्यान, निवतीत त्या शासकीय कामासाठी गेल्या होत्या. वृत्तपत्रात ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या तसे काही झाले नाही. अधिकारी म्हटल्यावर शासकीय कामात अडथळा आणणे किंवा विरोध होणे हे प्रकार घडतातच. कार्यालयीन वेळेच्या बाहेरही आम्हाला काम करावे लागते. मच्छिमार बोटींची तपासणी करताना केव्हाही घटनास्थळी जावे लागते. जिल्ह्यात मच्छिमार बांधवांमध्ये वाढणाऱ्या संघर्षाचा निपटारा करा. आपापसात वाद घालण्यापेक्षा जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करा. पाठिंंबा देण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करा असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले. महिला अधिकाऱ्यांवर होणारा अन्याय दूर होण्यासाठी आम्ही महिला आयोगाकडे दाद मागू असे महिलांनी सांगितले.
निवती येथे बुधवारी झाल्या प्रकाराबाबत पाठिंबा दर्शवण्यासाठी मालवणातील मत्स्य व्यवसायिक व महिला प्रतिनिधी यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांची भेट घेतली.
यावेळी नगरसेविका सेजल परब, दीपा शिंदे, चारुशीला आचरेकर, मेघा सावंत, पूजा सरकारे, पूनम आचरेकर, मनीषा येरागी, अस्मिता ढोलम, लक्ष्मण कोयंडे आदी महिला उपस्थित
होत्या. (वार्ताहर)

कार्यालयातून महिलांचा काढता पाय
जिल्ह्यात महिला अधिकारी सक्षमपणे जबाबदारी पार पाडत असताना त्यांना अडवणुकीसारखे प्रकार घडतात. या प्रवृत्तीला आम्हा महिलाचा ठाम विरोध आहे. जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे अन्याय होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत. आम्ही महिला या नात्याने या अधिकाऱ्यांच्या मागे खंबीर उभे राहू. असे मच्छिमार व महिलांनी सागितले. तुम्ही चांगल्या भावनेने आलात. मात्र, मला पाठिंबा नको. मी शासकीय अधिकारी आहे. तुमची भूमिका महिला म्हणून चांगली आहे. याआधी मत्स्य कार्यालयात मासळी ओतण्याचे प्रकार घडले होते, तेव्हा तुम्ही पाठिंबा द्यायला आला नाहीत. यावर एका महिलेने त्यांना पाठिंबा नको असेल, तर आम्ही काय इथे हळदीकुंकूसाठी थांबायचे काय ? असा सवाल करत कार्यालयातून काढता पाय घेतला.

Web Title: Keep calm than support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.