काणेकरांनी राजकारणापलिकडे नाती जपली
By Admin | Updated: December 29, 2014 23:41 IST2014-12-29T22:09:42+5:302014-12-29T23:41:43+5:30
नारायण राणे यांची आदरांजली : शोकसभेला सर्वपक्षीयांची गर्दी

काणेकरांनी राजकारणापलिकडे नाती जपली
बांदा : श्रीपाद काणेकर यांनी केवळ समाज हितासाठी, समाज घडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी नाती जपली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच आग्रही असायचे. त्यांचासारखा त्यागी वृत्तीचा कार्यकर्ता पुन्हा होणे नाही. त्यांच्यातील समाजशीलतेचे गुण आपण आत्मसात केल्यास हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे आयोजित शोकसभेत केले.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीपाद काणेकर यांची शोकसभा येथील संतोषी माता मंगल कार्यालयात सोमवारी झाली. यावेळी काणेकर यांच्या विविध आठवणींना उजाळा देत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दीपक केसरकर, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी खासदार नीलेश राणे, काका कुडाळकर, राजेंद्र म्हापसेकर, सरपंच प्रियांका नाईक, प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, विलास हडकर, प्रभाकर सावंत, श्यामकांत काणेकर, पुखराज पुरोहित आदी उपस्थित होते.
नारायण राणे यांनी यावेळी युती शासन काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. युती शासन काळात निवडणुकांसाठी होणाऱ्या बैठकांना भाजपाला किती जागा मिळवायच्या याचे कौशल्य त्यांचेकडे होते. काजू व्यवसायावरील सेल टॅक्स कमी करावा, अशी मागणी त्यांनी आपण मुख्यमंत्री असताना केली होती. आपल्या विधानसभेतील पराभवाबाबत त्यांनी फेसबुकवर नारायण राणे हरले नाहीत तर कोकण हरले, अशी प्रतिक्रिया दिली होती.
माधव भंडारी म्हणाले की, श्रीपाद काणेकर हे अभ्यासू वृत्तीचे होते. नवीन विचार, विषय जाणून घेण्याची त्यांची प्रवृत्ती होती. या वयातही ते माहिती तंत्रज्ञानात पारंगत होते. जिल्ह्यात भाजपाच्या उभारणीत त्यांचे महत्वाची योगदान होते. तळागाळात त्यांनी खडतर परिश्रमातून त्यांनी कार्य केले. माजी राज्यमंत्री भाई गिरकर म्हणाले की, श्रीपाद काणेकर हे खऱ्या अर्थाने किंग मेकर होते. मात्र किंग होण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही.
विलास हडकर, पुखराज पुरोहित, श्यामकांत काणेकर यांनी श्रीपाद काणेकरांबद्दलच्या आठवणी सांगितल्या. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजु परब, भाजपा तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, माजी सरपंच शितल राऊळ, पंचायत समिती सदस्य श्वेता कोरगावकर, स्वप्निल नाईक, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, अन्वर खान, डॉ. जयेंद्र परुळेकर, संदिप कुडतरकर, गुरुनाथ सावंत, राजन कळंगुटकर, बाळा आकेरकर, सनी काणेकर, सिध्देश पावसकर, सुनिल धामापूरकर, दादु कविटकर, साई कल्याणकर आदींसह
सर्वपक्षिय कार्यकर्ते उपस्थित
होते. (प्रतिनिधी)