‘कस्तुरीरंगन’ अहवालाचा केंद्र फेरविचार करणार : राऊत
By Admin | Updated: August 3, 2014 22:43 IST2014-08-03T22:07:49+5:302014-08-03T22:43:09+5:30
इंदापूर ते झारापपर्यंत एकही टोल असणार नाही

‘कस्तुरीरंगन’ अहवालाचा केंद्र फेरविचार करणार : राऊत
सावंतवाडी : केंद्रशासन कस्तुरीरंगन अहवालाचा फेरविचार करणार असून, त्याबाबतचा महाराष्ट्र शासनाकडे अहवाल मागितला आहे. पण शासनाने हा अहवाल अद्याप दिला नसल्याने पुढील कारवाई केंद्र सरकारने केली नाही, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अनारोजीन लोबो, संपर्कप्रमुख शैलेश परब, रूपेश राऊळ, एकनाथ नारोजी, शब्बीर मणियार यावेळी उपस्थित होते. राऊत म्हणाले, कस्तुरीरंगन अहवालाप्रमाणे आता कारवाई सर्वत्र सुरू झाली आहे. मात्र, या कारवाईस विरोध आहे. केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाबाबत फेरविचार करण्याचे ठरविले असून, त्यांनी तशाप्रकारे महाराष्ट्र शासनाकडे सविस्तर अहवाल मागितला. पण महाराष्ट्राने हा अहवाल केंद्राला दिला नाही. मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तत्कालीन पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याकडून माहिती घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच माळीण गावात जी दुर्घटना घडली. त्यानंतर केंद्र सरकारने डोंगराच्या पायथ्याच्या गावांचा सर्व्हे सुरू केला आहे. येथील कळणे व साटेली मायनिंगला तीव्र विरोध असून तेथील ग्रामस्थांच्या मागे कायम उभे राहू, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
इंदापूर ते झारापपर्यंत एकही टोल असणार नाही
इंदापूरपासून झारापपर्यंतच्या महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करा, असे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यानुसार राजापूर पर्यंतचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. आता त्यापुढील टप्प्याचे भूसंपादन लवकरात लवकर सुरू केले जाईल. या रस्त्यावर इंदापूरपर्यंत एक टोल असेल मात्र, इंदापूरनंतर झारापपर्यंत एकही टोल असणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. तसे नव्या नियमात नोंद आहे, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली आहे. इंदापूर पर्यंतचा रस्ता हा बीओटी तत्त्वावर असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
-माजी आमदार परशुराम उपरकर यांना आपण फक्त सज्जन असल्याचा भास होतो. त्यांची ही चिवचिव फुकटची आहे, अशी टीका यावेळी खासदार राऊत यांनी केली आहे.