कसई दोडामार्ग नगरपंचायत होणार

By Admin | Updated: April 10, 2015 00:27 IST2015-04-09T22:37:29+5:302015-04-10T00:27:37+5:30

तहसीलदारांची प्रशासक म्हणून नेमणूक : पुन्हा वाजणार निवडणुकांचे बिगुल--वार्तापत्र दोडामार्ग

Kasai Dodamarg Nagar Panchayat will be held | कसई दोडामार्ग नगरपंचायत होणार

कसई दोडामार्ग नगरपंचायत होणार

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग  -दोडामार्ग तालुक्यातील कसई - दोडामार्ग ग्रामपंचायत आता नगरपंचायत होणार असल्याने मंगळवारी ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. दोडामार्गला नगररचनेचा दर्जा मिळाल्याने ग्रामपंचायत बरखास्त करून नवीन नगरपंचायतीची रचना केली जाणार आहे. ग्रामपंचायत बरखास्त केल्यानंतर प्रशासक म्हणून दोडामार्ग तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. यानंतर केव्हाही नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होणार असून ग्रामपंचायत सदस्य हे नगरसेवक पदाकरिता निवडणूक लढविणार आहेत. या साऱ्या बदलत्या परिस्थितीमुळे येथील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. प्रथम नगराध्यक्षाचा मान कोणाला मिळणार याकडे आता तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने तालुक्याच्या मुख्य ठिकाणी असलेल्या गावांना नगरपंचायतचा दर्जा देण्याचे निश्चित केले आहे. त्यादृष्टीने पाऊल उचलून कसई-दोडामार्ग ग्रामपंचायतीला नगररचनेचा दर्जा देण्यात आला. तसे अधिकृत पत्र तहसीलदार यांना १९ मार्च २0१५ रोजी देण्यात आले. कसई- दोडामार्ग ग्रामपंचायत ही मुख्य ग्रामपंचायत आहे. तालुक्याच्या ठिकाणी असल्याने विकास प्रक्रियेचे महत्त्वाचे साधन आहे. सावंतवाडी दोडामार्ग एकच तालुका अस्तित्वात होता. त्यामुळे दोडामार्ग या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मागास, दुर्गम म्हणून या गावाची ओळख होती. २७ जून १९९९ रोजी दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाली आणि दोडामार्ग नूतन तालुका स्थापन झाला. येथे ग्रामपंचायत अस्तित्वात आली. ग्रामपंचायतमधून गावाचा विकास होऊ लागला. दोडामार्गला गोवा बाजारपेठ जवळ असल्याने या तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकांची रहदारी वाढली. बांधकाम क्षेत्रातही वाढ झाली. त्यामुळे कसई -दोडामार्ग या महसूल गावाला गावाचे स्थानिक क्षेत्र ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होत असलेले संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट केले आहे. स्थानिक क्षेत्रासाठी कसई -दोडामार्ग नगरपंचायत या नावाने नगरपंचायतीची रचना केली आहे. नगरविकास विभाग यांच्याकडून १९ मार्चला तहसीलदार, ग्रामपंचायतीला व गटविकास अधिकारी यांना पत्रे आली. त्यामुळे ग्रामपंचायत केव्हाही बरखास्त होऊन नगररचनेची कार्यवाही सुरू होणार असे वाटत होते.


नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
इच्छुक नगरसेवकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ६ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र तहसीलदार, ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी यांना आली असून यात म्हटले आहे की, नव्याने रचना केलेल्या कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची रितसर रचना होईपर्यंत उक्त नगरपंचायतीचे अधिकार, कर्तव्य पार पाडण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या ३४0 च्या पोटकलम २ मधील खंड व कलम ३४१ क द्वारे प्रदान केलेल्या नियमांद्वारे अधिकारांचा वापर करून कसई- दोडामार्ग नगरपंचायतीची रचना होईपर्यंत नगरपंचायतीशी संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी तहसीलदार दोडामार्ग यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे
७ एप्रिलपासून नगरपंचायतीची कार्यवाही सुरू करण्यात आली
आहे. त्यामुळे ग्रामपंचायत
बरखास्त करण्यात आली
आहे.

Web Title: Kasai Dodamarg Nagar Panchayat will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.