स्वातंत्र्य लढ्यासाठी कर्णिकांची प्राणाहुती

By Admin | Updated: August 9, 2014 00:37 IST2014-08-08T21:36:23+5:302014-08-09T00:37:13+5:30

क्रांतिदिनी आठवणींना उजाळा : करूळमधील स्मारकाच्या देखभालीची गरज

Karna pranahuti for freedom fight | स्वातंत्र्य लढ्यासाठी कर्णिकांची प्राणाहुती

स्वातंत्र्य लढ्यासाठी कर्णिकांची प्राणाहुती

निकेत पावसकर - नांदगाव ,, करूळ गावाला समृद्ध वाड्मयीन, सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. तसाच राष्ट्रीय पातळीवरील स्वातंत्र्यलढ्याचा वारसा हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या हौतात्म्याने लाभलेला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक देशभक्तांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आत्मबलिदान करून स्वातंत्र्यदेवतेच्या चरणी देह अर्पण केला. अशाच भारतीय वीर सुपुत्रांपैकी एक करूळ गावचे हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक.
कणकवली तालुक्यातील करूळ येथे १५ जून १९१३ रोजी भास्कर पांडुरंग कर्णिक यांचा जन्म झाला. वडीलांच्या शिक्षकी पेशामुळे नेहमी गावोगावी फिरावे लागायचे. त्यातच मुंबई येथे विश्वविद्यालयात त्यांनी रसायनशास्त्राची पदवी संपादन केली आणि चरितार्थासाठी पुणे खडकी येथील दारूगोळा निर्मितीच्या कारखान्यात नोकरी करू लागले.
त्यातच आॅगस्ट १९४२ मध्ये मुंबईच्या गवालीया टॅँक मैदानावर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले. त्यात ब्रिटीशांनी भारत सोडून जावे, या ठरावावर शिक्कामोर्तब होणार होते. त्यामुळे ९ आॅगस्ट १९४२ चा दिवस उजाडण्यापूर्वीच इंग्रज सरकारने पंडीत नेहरू, महात्मा गांधी, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांना अटक केली. तरीही त्यानंतर जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरूणा असफअली, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आदी देशभक्तांनी भूमिगत राहून अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, रेल्वेमार्गाची मोडतोड करणे, विजेच्या तारा तोडणे आदी कृत्य केली. त्यावेळी भास्कर कर्णिकही महत्त्वाची भूमिका बजावत होते. ‘कॅपिटल व वेस्ट एंड’ ही पुण्यातील दोन सिनेमागृहे होती. तिथे गोरे अधिकारी याच ठिकाणी परिवारासह सिनेमा पहायला जात. त्यादिवशी कॅपिटल सिनेमागृहात प्रचंड बॉम्बस्फोट झाला. त्यात चार युरोपियन्स ठार झाले व १४ जण जखमी झाले. त्यावेळी हॅमंड व रोच या गोऱ्या अधिकाऱ्यांची माथी भडकली. दारूगोळा कुठून आला? बॉम्ब कसे बनवले? याबाबत हैराण झाले. त्यानंतर अनेकांची धरपकड झाली.
प्रथम हाती लागला तो आगाशे नावाचा तरूण. त्याच्याकडून जोगेश्वरीच्या देवळाचे पुजारी भालचंद्र बेंद्रे यांचे नाव समजले. मध्यरात्रीनंतर देवळाला वेढा देऊन झोपेत असताना बेंद्रेंना पकडले. तर दुसऱ्या दिवशी जंगली महाराजांच्या देवळासमोरील जज्ज पाटील यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या भास्कर पांडुरंग कर्णिक नावाच्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिस्तुल रोखून उलट सुलट तपासणी केली. खोलीची झडती घेतली असता खॉटखाली ढिगभर बॉम्ब सापडले. हॅन्ड ग्रेनेड्स बनवायची स्फोटके सापडली.
त्यानंतर भास्कर कर्णिकला हॅमंडचे फरासखान्यात मुसक्या बांधून आणले व पोलिसांना इशारा दिला. बाहेर केसरीचे वार्ताहर वि. स. माडीवाले व सकाळचे भि. न. ठाकोर बातम्या मिळविण्यासाठी आले होते. त्यांनी भास्करला पोलिसांच्या गराड्यात पाहिले. भास्कर शांतपणे म्हणाला, साहेब तुम्ही मला पकडलेच आहे. आता मी काय लपवणार? तुम्हाला मी माझ्या सहकाऱ्यांची सर्व नावे सांगतो, पण मला खूप लघवीला लागली आहे. जरा जाऊन येतो. पोलिसांनी खुश होऊन परवानगी दिली. पुढेमागे पोलीस ठेवून भास्कर कर्णिक यांना शौचालयात जाऊ दिले. त्याने दार लोटून घेतले आणि १० मिनिटातच बाहेर आला आणि फरासखान्याच्या पहिल्या चौकाच्या अलिकडे धाडकन खाली कोसळला. काय झाले कुणालाच कळेना. पोलीसही चक्रावून गेले.
हॅमंड साहेबांनी तातडीने डॉ. जेजुरीकरांना बोलावून भास्करला तपासायला लावले. पण भास्करचे प्राण कधीच गेले होते. हॅमंडच्या अमानुष मारहाणीपुढे कदाचित आपला टिकाव लागला नाही आणि चुकूनसुद्धा आपल्या सहकाऱ्यांची नावे तोंडातून जाऊ नयेत यासाठी हुतात्मा भास्कर कर्णिक याने योजना आखून ठेवली होती.
त्याने पोटॅशियम सायनाईटच्या जहाल विषाची कुपी मुद्दाम वाढवलेल्या नखामध्ये लपवून ठेवली होती. लघवीच्या निमित्ताने शौचालयात जाऊन ते विष पिऊन टाकले आणि पोलिसांच्या कचाट्यातून आणि पुढील लढ्यासाठी आपल्या इतर सहकाऱ्यांची सुटका केली. ३० जानेवारी १९४३ रोजी भास्कर पांडुरंग कर्णिक याने हौतात्म्य पत्करले.

क्रांतिकारकांचा मार्ग पत्करला
भारतात ब्रिटीश सत्तेविरूद्ध लढा सुरू असताना संवेदनशील मनोवृत्तीच्या भास्कर कर्णिक यांच्या मनावर परिणाम होणे साहजिकच होते. ब्रिटीशांच्या या पाशवी सत्तेला सुरूंग लागेल, अशी स्फोटक कृती करावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, वि. दा. सावरकर आदी क्रांतिकारकांचा मार्ग त्यांना जवळचा वाटला. करूळ येथे दरवर्षी ९ आॅगस्टला हुतात्मा दिनी विविध शासकीय अधिकारी उपस्थित राहून आदरांजली वाहिली जाते. मात्र, या राष्ट्रीय स्मारकाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसते. १ एकर २० गुंठे जागेत ग्रामस्थांनी बांधलेले व राज्य शासनाने बांधलेले अशी दोन स्मारके आहेत. याठिकाणी २६ जानेवारी, १५ आॅगस्टला झेंडावंदन केले जाते. सर्व शाळांचे विद्यार्थी, ग्रामस्थ एकत्र येतात. मात्र, या स्मारकाच्या देखभालीकडे लक्ष दिले पाहिजे. कारण हे स्मारक एक राष्ट्रीय स्फूर्तीदायक स्थळ बनले पाहिजे. करूळसह जिल्ह्याचे ते भूषण आहे.

Web Title: Karna pranahuti for freedom fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.