सनईने कणकवलीवासीय मंत्रमुग्ध
By Admin | Updated: March 3, 2015 00:36 IST2015-03-02T21:51:18+5:302015-03-03T00:36:08+5:30
कणकवलीत संगीत महोत्सव : शैलेश भागवत यांचे सनई वादन

सनईने कणकवलीवासीय मंत्रमुग्ध
कणकवली : मंगल वाद्यांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या सनईचे सूर अलीकडे कानावर पडणे दुरापास्त झाले आहे. मात्र, राष्ट्रीय कीर्तीचे सनईवादक पं. शैलेश भागवत यांच्या सनई वादनाने कणकवलीवासीय मंत्रमुग्ध झाले. सनईचे सुमधूर सूर ऐकण्याची संधी रसिकांना अविस्मरणीय आनंद देऊन गेली. निमित्त होते ते वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवातील सनई वादनाचे.
आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवात शनिवारी रात्री पं. शैलेश भागवत यांनी सनई वादन केले. संगीत मैफिलीचा प्रारंभ त्यांनी राग ‘शंकर’ने केला. लवकरच होळीच्या उत्सवाला सुरुवात होणार असल्याने होळी रागातील गीत सनईवर त्यांनी सादर केले. एकाहून एक सरस असे राग त्यांनी सनईद्वारे सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. भारतरत्न बिस्मिल्ला खाँ यांनी आपल्या सनई वादनाने अजरामर केलेला राग ‘मालकंस’ पं. शैलेश भागवत यांनी सादर करून रसिकांची दाद मिळवली. रसिकांच्या आग्रहाखातर ‘गुंज उठी शहनाई’ या चित्रपटातील ‘तेरे सूर और मेरे गीत’ हे गाजलेले गीत त्यांनी सादर केले, तर ‘नटबिहाग’ या रागाने मैफिलीची सांगता केली. आपण प्रथमच कणकवलीतील या संगीत महोत्सवानिमित्त येथे आलो
असल्याचे सांगत येथे निमंत्रित केल्याबद्दल तरंगिणी प्रतिष्ठान व आचरेकर प्रतिष्ठानचे त्यांनी आभार मानले.
महोत्सवातील संगीत मैफिलीचा प्रारंभ प्रतिष्ठानच्या सघनगान केंद्रातील विद्यार्थिनी सुहिता केरकर हिच्या गायनाने झाला. ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या अभंगाने तिने मैफिलीची सांगता केली.
आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित शास्त्रीय संगीत रसग्रहण कार्यशाळेला शनिवारी प्रारंभ झाला. देवकी पंडित यांची गायन कार्यशाळा, तर पं. शैलेश भागवत यांची सनई वादनाची कार्यशाळा याअंतर्गत झाली. (वार्ताहर)
देवकी पंडित यांच्या गायनाने रंगत
सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्या गायनाने या संगीत महोत्सवात आणखीनच रंगत आणली. ‘राजश्री’ या रागाने त्यांनी संगीत मैफिलीला सुरूवात केली. जगप्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर यांनी या रागाची निर्मिती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर सोनी, दुताई या दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या. देवकी पंडित यांचे गायन ऐकण्याची शास्त्रीय संगीतातील जाणकारांना एक पर्वणीच या महोत्सवाच्या माध्यमातून लाभली होती. रसिकांच्या आग्रहाखातर संत चोखोबांचा ‘आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन’ हा अभंग त्यांनी सादर केला. गायनाबरोबरच अभंगाच्या आशयालाही रसिकांनी दाद दिली. ‘सब सखिया समजये’ ही भैरवी गाऊन पंडित यांनी मैफिलीची सांगता केली.