कणकवली तालुका हागणदारीमुक्त
By Admin | Updated: September 30, 2015 00:03 IST2015-09-29T21:46:35+5:302015-09-30T00:03:15+5:30
स्वच्छ भारत अभियान : १ आॅक्टोबरला उत्सवी कार्यक्रम

कणकवली तालुका हागणदारीमुक्त
कणकवली : तालुक्यातील ६३ ही ग्रामपंचायतींमधील गावांत कुटुंबागणिक शौचालयांची उपलब्धता झाल्याने कणकवली तालुका हागंदारीमुक्त झाला आहे. येत्या १ आॅक्टोबर रोजी त्यानिमित्त उत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, ग्रामविस्तार अधिकारी अरूण चव्हाण आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाअभावी उघड्यावर शौचाला जाणाऱ्या प्रत्येकासाठी शौचालय उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ज्या तालुक्यांनी हे उद्दीष्ट प्राप्त केले आहे. त्यांना हागंदारीमुक्त तालुका घोषित केले जाते. कणकवली तालुक्यातील २०१२ च्या सर्वेक्षणावर आधारित ६३ ग्रामपंचायतींमधून ४३३५ शौचालये उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट होते. शेवटच्या टप्प्यात सात ग्रामपंचायतींमध्ये शौचालये उपलब्ध करून देण्याचे काम बाकी होते. ते आता पूर्ण झाले आहे. आता यासंदर्भातील आॅनलाईन माहिती भरण्याचे काम सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांत ही माहिती अपडेट होईल. येत्या काळात शासनाच्या समितीकडून तालुक्यातील हागंदारीमुक्तीच्या कामाची पाहणी होईल.
१ आॅक्टोबर रोजी हागंदारीमुक्तीच्या उत्सवी कार्यक्रमानिमित्त पंचायत समिती कार्यालयाकडून सकाळी ९ वाजता रॅलीचा प्रारंभ होईल. या रॅलीत विद्यार्थ्यांसह, शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांसह ढोलपथक, पथनाटय आणि चित्ररथ असतील. पंचायत समितीपासून डीपी रोडवरून भगवती मंगल कार्यालयाकडे मुख्य कार्यक्रमस्थळी रॅलीचा समारोप होईल.
भगवती मंगल कार्यालयातील कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्यासह जिल्हा परिषदेतील विशेष समित्यांचे पदाधिकारी, खातेप्रमुख, सरपंच, ग्रामसेवक, खातेप्रमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि हागंदारीमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार होणार आहे, असे आस्था सर्पे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सार्वजनिक शौचालयांसाठी प्रयत्न
गावातील रहिवाशांव्यतिरीक्त गावात परगावातून तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या मजूरवर्ग आदींना शौचालयाची व्यवस्था नसल्यास ते उघड्यावर शौचास जातात.
त्यांचाही विचार करण्यात येत सार्वजनिक शौचालयांसाठी प्रस्ताव मागवण्यात येतील.
असे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी बोलताना सांगितले.