कणकवली, रत्नागिरीत ‘सरकते जिने’

By Admin | Updated: June 1, 2015 00:21 IST2015-05-31T23:17:07+5:302015-06-01T00:21:26+5:30

दोन महिन्यात पूर्ण होणार : कोकण मार्गावरील पहिला ट्रॅव्हलेटर रत्नागिरीत !

Kankavali, 'Sarkate Jeane' in Ratnagiri | कणकवली, रत्नागिरीत ‘सरकते जिने’

कणकवली, रत्नागिरीत ‘सरकते जिने’

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर येत्या दोन ते तीन महिन्यांत ‘ट्रॅव्हलेटर’ यंत्रणा (पायरीविरहित सरकता जिना) बसविली जाणार आहे. या स्वयंचलित यंत्रणेमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील प्रवाशांची जिना चढण्यासाठी होणारी दमछाक थांबणार आहे. कोकण रेल्वेमार्गावरील ही पहिलीच ‘ट्रॅव्हलेटर’ यंत्रणा ठरणार असून, त्यासाठी १८ लाखांचा खर्च येणार आहे. रत्नागिरी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. २ वर महिन्याभरापूर्वीच ४० लाखांच्या पायऱ्या असलेल्या सरकत्या जिन्याचे (एक्सलेटर) काम सुरू झाले आहे. कणकवली, मडगाव येथेही असे एक्सलेटर उभारले जाणार आहेत. रत्नागिरी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर २ वरील एक्सलेटरचे काम घेतलेल्या ठेकेदारानेच प्लॅटफॉर्म नंबर १ वरील ट्रॅव्हलेटरचे काम स्वीकारले असून, येत्या दोन महिन्यांच्या काळात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रात रेल्वेमंत्री झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेकडे विशेष लक्ष दिले असून, प्रत्येक स्थानकावर कोणत्या सुविधा हव्यात, याचा अभ्यास केल्यानंतर आता त्याची कार्यवाही केली जात आहे. त्याअंतर्गत रेल्वे स्थानकांवर कोकण मेवा स्टॉल्स सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर आता एक्सलेटर व ट्रॅव्हलेटर बसविण्यात येत आहेत. रत्नागिरी हे कोकण रेल्वेमार्गावरील मध्यवर्ती व महत्त्वाचे असे स्थानक आहे; मात्र हे स्थानक सखल भागात असल्याने दोन जिने खाली उतरून प्लॅटफॉर्मवर जावे लागते. उतरताना फारसा त्रास होत नसला, तरी गाडीतून उतरल्यावर हाती सामानाचे ओझे घेऊन हे दोन जिने चढून जाताना प्रवाशांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. प्लॅटफॉर्म नंबर १ वर अपंग, वृद्धांसाठी उदवाहन (लिफ्ट)ची सोय करण्यात आली आहे; मात्र सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबाबत याआधी विचारच झाला नव्हता. आता प्रभू यांच्या व्हिजनमधून कोकण रेल्वेमार्गावर अनेक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.


पत्राशेडची लांबी वाढवा...
रत्नागिरी हे स्थानक मोठे असले तरी केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पत्र्याची शेड निम्म्या प्लॅटफॉर्म अंतरापर्यंत उभारण्यात आली आहे. ती पूर्णत: उभारावी व प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर अत्यंत अपुरी असलेली पत्र्याची शेडही पूर्ण प्लॅटफॉर्मवर उभारण्यात यावी. रत्नागिरी स्थानकावरील प्रवाशांची नेहमीची वर्दळ पाहता पावसाळी व उन्हाळी सुरक्षेसाठी पत्र्याची शेड पूर्णत: उभारावी तसेच मार्गावरील अन्य स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवरही पत्राशेड पुरेशा प्रमाणात उभाराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Web Title: Kankavali, 'Sarkate Jeane' in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.