कणकवली : विसर्जन मिरवणुकांनी रंगत
By Admin | Updated: October 5, 2014 23:05 IST2014-10-05T21:36:22+5:302014-10-05T23:05:27+5:30
नवरात्रोत्सवाची सांगता : दहा दिवस कार्यक्रमांची रेलचेल

कणकवली : विसर्जन मिरवणुकांनी रंगत
कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात गेले दहा दिवस मोठ्या उत्साहात सुरु असलेल्या नवरात्रोत्सवाची सांगता श्री दुर्गादेवीला निरोप देऊन करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. येथील जानवली नदीवरील गणपती सान्यावर श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
श्री दुर्गादेवीची ढोलताशांच्या गजरात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कणकवली शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, बाजारपेठ मित्रमंडळ, कणकवली तालुका गोंधळी समाज संघाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाचा समावेश होतो. घटस्थापनेने मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला होता. गेले दहा दिवस विविध धार्मिक, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रुप डान्स स्पर्धा, दशावतारी नाट्यप्रयोग, डबलबारी भजनाचे सामने, गीतगायन मैफिल अशा कार्यक्रमांचा समावेश होता.
गरबा नृत्यालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत होता. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गादेवीला निरोप देण्यात आला. सायंकाळी ५ वाजल्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी भव्य मिरवणुका विविध मंडळाच्यावतीने काढण्यात आल्या. ढोलताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या मिरवुणकीमध्ये लहानथोर सहभागी झाले होते. इतरांपेक्षा आपली विसर्जन मिरवणूक सरस व्हावी यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील होते. रात्री १.३० वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. ढोलताशांसह डीजेचाही वापर या मिरवणुकांमध्ये करण्यात
आला. (वार्ताहर)