कणकवलीत मुलगा बुडताना वाचला
By Admin | Updated: September 4, 2014 00:05 IST2014-09-03T22:59:33+5:302014-09-04T00:05:50+5:30
गणेश विसर्जनासाठी सुरक्षिततेची व्यवस्था करणे गरजेचे

कणकवलीत मुलगा बुडताना वाचला
कणकवली : गुरूवारी गौरी गणपतींचे शहरात ठिकठिकाणी विसर्जन होणार आहे. ग्रामीण भागात विसर्जनासाठी स्थानिक मंडळीच हातभार लावतात. शहरात गणेश विसर्जनासाठी हौशी मुले आपला जीव धोक्यात घालत आहेत. नगरपंचायतीकडून विसर्जनाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
पाचव्या दिवशी गणेश विसर्जनासाठी गणपती सान्यावर जानवली नदीत उतरलेला सुमारे दहा वर्षे वयाचा मुलगा बुडता बुडता वाचला. मूर्ती विसर्जित करून परतताना तो बुडताना काहींनी पाहिले आणि आरडाओरडा केला. त्यावेळी आजूबाजूला विसर्जन करत असलेल्या इतर मुलांनी त्याला पाण्याबाहेर काढले. यावेळी कणकवली स्थानकाचे पोलीसही बंदोबस्तासाठी घटनास्थळी उपस्थित होते.
गणेश विसर्जनासाठी नगरपंचायतीकडून कोणतीही व्यवस्था न केल्याने हौशी पोहणारे विसर्जनासाठी पाण्यात उतरतात. या बदल्यात त्यांना गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्यांकडून पैसेही मिळतात.
नगरपंचायतीने गणपती साना आणि हायमास्टची उभारणी केली आहे. मात्र, पाचव्या दिवशी मूर्ती विसर्जनावेळी गणपती सान्यावर हायमास्ट दिवेही लागलेले नव्हते.
शहरात गणपती साना, मराठा मंडळ, कनकनगर बंधाऱ्यानजीक, टेंबवाडी आदी ठिकाणी जानवली आणि गडनदी पात्रात गणेश विसर्जन केले जाते. मात्र, कोणत्याही ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. नगरपंचायतीकडून विसर्जनस्थळी किमान एक कर्मचारी विसर्जनाच्या व्यवस्थापनासाठी ठेवणे गरजेचे आहे.
महसूल विभागाकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी लाईफ जॅकेटस आणि बोट उपलब्ध आहे. या साधनांचा गणेश विसर्जनावेळी वापर केला जाऊ शकतो. अनंत चतुर्दशीला शहरातील गणेश विसर्जन मोठ्या संख्येने केले जाते. त्यावेळी फक्त सुरक्षा न पुरवता दीड, पाच, सात दिवसांच्या गणेश विसर्जनासाठीही सुरक्षा व्यवस्था पुरवणे तेवढेच गरजेचे
आहे. (प्रतिनिधी)