कमलाकर साळसकर ठरले कर्तव्यदक्ष पोलीस

By Admin | Updated: July 15, 2015 00:19 IST2015-07-14T21:59:43+5:302015-07-15T00:19:23+5:30

२४ तास ‘आॅनड्युटी’ : कौतुकास्पद काम, प्रशासनाकडून गौरव आवश्यक

Kamalakar Salaskar became a distinguished police officer | कमलाकर साळसकर ठरले कर्तव्यदक्ष पोलीस

कमलाकर साळसकर ठरले कर्तव्यदक्ष पोलीस

रजनीकांत कदम - कुडाळ -चोरीच्या सत्राने भंडावून सोडलेल्या पोलीस कारभाराची रात्रपाळीची ड्युटी करून विश्रांतीसाठी तो घरी परतत होता. वाट घराची असली तरी विचार मात्र चोरीच्या तपासाचेच असल्याने मन सैरभैर होते. वाटेतच एक तेवीशीचा युवक चालत होता. त्याच्याजवळ असणारी बॅग व त्याचे झपाझप चालणे, तसेच संशयी नजर यामुळे रात्रभर ड्युटी करणाऱ्या त्या पोलिसाला अस्थिर झाले. त्याने न राहूनही चौकशी केली अन् तोच निघाला अट्टल चोरटा. रात्रपाळी करूनही चोवीस तास ‘आॅन ड्युटी’ राहत कर्तव्य बजावणाऱ्या त्या पोलिसाने आपणासह जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाची मान ताठ केली.
कुडाळचे पोलीस कर्मचारी कमलाकर साळसकर यांच्या कर्तव्यदक्षतेने चोरटा सापडला. पण याचा यथोचित गौरव प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाची एकावर एक अशा अनेक प्रकरणांनी कोंडी होत असताना साळसकरचे हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे.
कुडाळ येथील पोलीस कर्मचारी साळसकर हे शनिवारी रात्री आपली रात्रपाळीची ड्युटी आटोपून ओरोस येथील घरी परतत असताना वेताळबांबर्डे येथील महामार्गावरून चालत जाणाऱ्या एका युवकाला पाहून त्याचा संशय आला.
त्यांनी युवकाला थांबवून त्याची चौकशी केली व त्याच्याकडील बॅग तपासत असताना चोरट्याच्या बॅगेतील चोरी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू व काही दागिने पाहून हाच चोरटा असल्याची खात्री साळसकर यांची झाली. मात्र चोराच्या लक्षात येताच त्याने तेथून धूम ठोकली. साळसकर यांनी शिताफीने त्याचा पाठलाग केला पण तो पसार झाला. साळसकर यांनी याबाबत तत्काळ कुडाळ पोलिसांना माहिती दिली.
साळसकर यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे पोलिसांची तीन पथके वेताळबांबर्डे येथे तत्काळ दाखल झाली. चोरट्याचा वेताळबांबर्डे नजीकच्या जंगलभागात शोध घेण्यात आला. अखेर सायंकाळी उशिरा सुकळवाड येथे रेल्वेरुळाच्या ठिकाणी चोरटा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तपासाची चक्रे त्या दिशेने फिरली आणि बारा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

ग्रामस्थांचीही मेहनत
साळसकर यांनी चोरटा वेताळबांबर्डे येथील जंगलात पळाल्याचे कळताच जिल्ह्यातील पोलिसांची तीन विशेष पथके व ग्रामस्थ दिवसभर या चोरट्यांचा शोध रविवारी संपूर्ण दिवसभर घेत होती. पोलीस आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच चोरट्याला पकडण्यात यश आले.
...त्यामुळेच चोरटे पकडले
पोलीस कर्मचारी साळसकर हे आपली रात्रपाळी आटोपून घरी जात असताना वाटेत दिसलेल्या संशयीत युवकाची त्यांनी चौेकशी केली. तसेच त्याच्याकडील बॅगचीही तपासणी केल्यानंतर तो चोरटा असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांना तत्काळ याबाबत माहिती दिली. त्यामुळे चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याला पकडल्याने आता इतर चोरट्यांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होणार आहे. त्यामुळे साळसकर यांचा प्रशासनाकडून गौरव होणे गरजेचे आहे.
कर्तव्यदक्ष जागृत पोलिसाचे दर्शन
साळसकर घरी जात असताना त्यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साळसकर यांच्यातील ‘पोलीस’ हा कर्तव्यदक्षतेसाठी ‘आॅन ड्युटी २४ तास’ जागृत आहे, याचा अनुभव यामुळे आला.

Web Title: Kamalakar Salaskar became a distinguished police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.