तळवडे दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा
By Admin | Updated: December 25, 2014 00:22 IST2014-12-24T21:11:59+5:302014-12-25T00:22:47+5:30
राऊळ महाराजांची भेट : रांगोळी, चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद

तळवडे दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा
तळवडे : तळवडे येथील श्री देव दत्त मंदिर कलशारोहण सोहळा थाटात पार पडला. या कलशारोहण सोहळ्याला प. पू. अण्णा राऊळ महाराज यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या.
तळवडे- खेरवाडी येथील श्री देव दत्त मंदिर हे जागृत देवस्थान असून परब कुटुंबीय या देवस्थानची देखभाल व सर्व धार्मिक विधी पार पाडतात. यावर्षी या पुरातन मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले. या मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. या शिखर कलशारोहण सोहळ्याला हजारो भक्तांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. हा सोहळा चार दिवस सुरू होता. कलशारोहण सोहळ्यास राज्यमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार शंकर कांबळी, सावंतवाडी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले. सोहळ्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांकरिता रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी प्रोत्साहनपर उपक्रमांचे आयोजन तळवडे-खेरवाडी श्री दत्त मंदिर व्यवस्थापन कमिटी व मित्रमंडळाने केले होते. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तळवडे पंचक्रोशीत आकर्षक आणि भव्य असे दत्त मंदिर साकारण्यात आले आहे. याचा दत्तभक्तांना लाभ घेता येणार आहे. (प्रतिनिधी)