किनळोस गावात कोळसुंद्यांची दहशत
By Admin | Updated: September 17, 2014 22:26 IST2014-09-17T21:15:58+5:302014-09-17T22:26:48+5:30
मेंढपाळांमध्ये भीती : पाच वर्षानंतर आगमन

किनळोस गावात कोळसुंद्यांची दहशत
कडावल : किनळोस गावात पाच वर्षांनंतर कोळसुंद्यांंचे पुन्हा आगमन झाले आहे. प्रसंगी बिबट्या किंवा वाघालाही मारण्याची क्षमता असणाऱ्या या हिंस्त्र प्राण्याच्या अस्तित्वामुळे येथील मेंढपाळांच्या उरात धडकी भरली आहे. तर शेतकरी मात्र काहीसा रिलॅक्स झाला आहे. पाच वर्षांनंतरच का.... हा प्रश्न कित्येक पिढ्यांनंतर आजही अनुत्तरीत असून, या प्रकाराविषयी जनमानसात कुतूहल निर्माण झाले आहे.
किनळोस ब्राम्हणस्थळ व देवाची गाळी परिसरात कोळसुंद्यांचा कळप गुराख्यांच्या दृष्टीस पडला. कळपात पूर्ण वाढ झालेले सुमारे बारा कोळसुंदे आहेत. विशेष म्हणजे, या परिसरात दर पाच वर्षांनी कोळसुंंदे प्रकट होतात. गेल्या कित्येक पिढ्यांपासून हा प्रकार सुरू आहे. कोळसुंद्यांच्या आगमनाने येथील मेंढपाळ वर्गाची पाचावर धारण बसली आहे. त्यांना भीतीच्या छायेखाली काम करावे लागणार आहे.
येथील ब्राम्हणस्थळ भागात रानडुकरे, वनगाई, गवे व इतर रानटी प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्याकडून शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोळसुंद्यांच्या आगमनामुळे इतर प्राणी भीतीपोटी दूर जाणार असल्याने भातशेतीचे होणारे नुकसान टळणार आहे. एकंदरीत कोळसुंद्यांच्या आगमनाने मेंढपाळ वर्ग दहशतीखाली असला, तरी शेतकरी वर्ग मात्र काहीसा ‘रिलॅक्स’ झाला आहे. या प्राण्यांमुळे आतापर्यंत गावातील मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळसुंद्यांची शिकारही तितक्याच विशिष्ट पद्धतीने केली जाते. शिकारी लोक सावजाच्या डोळ्यात मूत्र शिंपडून त्याला प्रथम दृष्टीहीन करतात आणि मग त्याची शिकार के ली जाते. याविषयी प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराविषयी आश्चर्यही व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
कोळसुंद्यांचा कळप दाखल
पाच वर्षांनंतर किनळोस परिसरात कोळसुंद्यांचा कळप दाखल झाला आहे. या भागात दर पाच वर्षांनंतर कोळसुंद्यांचे अस्तित्व जाणवते. काही अपवाद वगळता, गेल्या कित्येक पिढ्यांपासून हा प्रकार सुरू आहे.