कालसेकरचा पुन्हा पोलिसांना गुंगारा
By Admin | Updated: July 16, 2015 00:26 IST2015-07-16T00:26:03+5:302015-07-16T00:26:03+5:30
हातावर तुरी : पोलिसांकडूनच पाठीशी घालण्याचा प्रयत्न?

कालसेकरचा पुन्हा पोलिसांना गुंगारा
चिपळूण : जिल्ह्यातील विविध २६ गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेला अट्टल गुन्हेगार साहील कालसेकर याने आज (बुधवारी) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयातून पळून गेला. साहीलने यापूर्वी अनेकवेळा पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या असल्याने काही पोलीस कर्मचारीच त्याला पाठिशी घालीत असल्याची चर्चा आहे. रविवारी गुन्हा अन्वेषण शाखेचे हवालदार उदय वाजे यांच्यावर रत्नागिरी येथे जीवघेणा हल्ला चढवून त्याने जिल्हा पोलीस दलासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
चिपळूण तालुक्यातील नायशी गावचा मूळ रहिवासी असणारा साहील काही वेळा शिरळबन मोहल्ला येथे आपल्या सासऱ्याकडेही राहतो. त्याची पत्नी आता गरोदर असून, त्याला पहिली एक मुलगी आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या साहीलवर चिपळूण पोलीस ठाण्यात १०, सावर्डे येथे २, संगमेश्वरमध्ये ३, देवरुखमध्ये १, रत्नागिरी शहर ८, पोलादपूर पोलीस ठाण्यात १, महाड पोलीस ठाण्यात १ असे २६ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांसाठी तो पोलिसांना हवा आहे. खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी उकळणे, चोऱ्या करणे, दुचाकी चोरणे, मारहाण करणे, पोलिसांच्या अंगावर चालती दुचाकी सोडणे, स्वत:च स्वत:चा चावा घेऊन पोलिसांवर आरोप करणे, न्यायालयात कागदपत्र फाडणे अशा अनेक गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे. वाऱ्याच्या वेगाने अनवाणी पळणारा साहील अत्यंत क्रूर स्वभावाचा असल्याचे पोलीस सांगतात.
पोलीस नाईक उदय वाजे यांनी पकडल्यानंतर त्याने त्यांना चावा घेतला होता. असाच प्रकार त्याने यापूर्वीही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केला होता. अटकेत असताना स्वत:च डोके आपटून घेऊन पोलिसांनी आपल्याला मारहाण केली, असा कांगावा तो करतो. अनेकवेळा आदळआपट करुन समोरच्याला जेरीस आणतो. काही वेळा पत्नीची ढाल करुन विरोधकांना निशाणा करतो व त्यांच्याकडून पैसे उकळतो. यापूर्वी रत्नागिरी येथे न्यायालयात त्याने प्रवीण घाग खून खटल्यात न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली होती, तसेच चिपळूण येथील न्यायालयातही न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली होती.
चिपळूण येथे ५ जानेवारी रोजी न्यायाधीशांच्या डायसवर चढून त्यांचा अवमान केला होता. याच दिवशी तो न्यायालयातून पळाला होता. परंतु, चिपळूण पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले होते. चिपळूण पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. त्यासाठी तो चिपळूण पोलिसांना हवा आहे. चिपळूण पोलीस त्याच्या शोधात आहेत. दरम्यान, जानेवारीत रत्नागिरी विशेष कारागृहातून त्याची सुटका झाल्यानंतर चिपळूण पोलीस कारागृहात पोहोचण्यापूर्वीच कारागृहातून तो बाहेर पडला होता. त्यानंतर चिपळूण पोलिसांनी जूनमध्ये त्याचा थरारक पाठलाग केला होता. मात्र कामथे घाटात तो पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
त्यानंतर रविवारी त्याने रत्नागिरी येथे पोलीस नाईक वाजे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. या झटापटीत साहीलही जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज (बुधवारी) सकाळी त्याने पुन्हा एकदा पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पळ काढला. पोलीस त्याच्या शोधासाठी जंगजंग पछाडत आहेत. शिरळ येथील सासूरवाडीबरोबरच त्याच्या मूळ गावी नायशी येथेही पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे. मात्र अद्याप तरी त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. (प्रतिनिधी)
अट्टल गुन्हेगार साहील कालसेकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याने चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत. शिवाय खुनाचा प्रयत्न, न्यायाधीश बाफना यांच्या अंगावर चप्पल फेकणे, शिरळ येथील शैलेश मोरे यांच्या घरात घरफोडी करणे, माजी उपसरपंच दिलावर काद्री यांच्यावर चाकू हल्ला करणे असे १० गुन्हे दाखल आहेत. सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे २ व खुनाचा १ गुन्हा दाखल आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चोरीचे ५, तर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १ व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १, पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे व शासकीय रुग्णालयातून पलायन प्रकरणी गुन्हा असे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे ३ गुन्हे दाखल आहेत, तर देवरुख, गुहागर, महाड व पोलादपूर (रायगड) पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा प्रत्येकी १ गुन्हा दाखल आहे. विविध २६ गुन्ह्यांमध्ये पोलिसांना तो हवा होता. नायशी येथील प्रवीण घाग खूनप्रकरणी आरोपी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, चोऱ्या, आत्महत्येचा प्रयत्न अशा विविध २९ गुन्ह्यात कालसेकरचा सहभाग.
न्यायाधिशांवर दोन वेळा भिरकावली चप्पल, तर एकवेळा न्यायाधीशाच्या डायसवर चढला.
पकडल्यानंतर पोलिसांविरोधात करतो कांगावा व पोलिसांवरच करतो हल्ला.
पोलिसांनी थरारक पाठलाग करुनही वाऱ्याच्या वेगाने तो गेला पळून.
विक्षिप्त स्वभावाच्या कालसेकरने न्यायाधिशांचा केला होता अवमान.
नायशी येथील प्रवीण घाग खून प्रकरणातील आरोपी.
पत्नीची ढाल करुन अनेकांना करतो ब्लॅकमेल.
जिल्हा रुग्णालयातून पळून जाऊन पुन्हा दिले पोलिसांना आव्हान.
काही पोलीस कर्मचारीच साहीलला मदत करीत असल्याची चर्चा.