कुडाळात होणार चौरंगी लढत
By Admin | Updated: September 28, 2014 00:16 IST2014-09-28T00:16:09+5:302014-09-28T00:16:09+5:30
काँग्रेसतर्फे नारायण राणे, राष्ट्रवादीकडून पुष्पसेन सावंत यांचा अर्ज

कुडाळात होणार चौरंगी लढत
कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे, राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे पुष्पसेन सावंत, तर भाजपच्यावतीने विष्णू मोंडकर यांनी अर्ज दाखल केला आहे. सेनेतर्फे वैभव नाईक यांनी शुक्रवारीच अर्ज दाखल केला असल्याने या मतदारसंघात चौरंगी निवडणूक रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानेही कुडाळ मतदारसंघातून उमेदवारी भरणाऱ्या संभाव्य सर्व उमेदवारांनी शनिवारी गर्दी केली होती. कुडाळ शहरातील नक्षत्र टॉवर येथील काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाच्या ठिकाणी शनिवारी सकाळपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी जमू लागले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शहरातून भव्य अशी रॅली काढत नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात भरला. राष्ट्रवादीचे उमेदवार पुष्पसेन सावंत यांच्या पाठीशी या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत, हे दाखविण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. पुष्पसेन सावंत यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अर्ज भरला.
भाजपाकडून सरचिटणीस राजू राऊळ, रविकिरण तोरसकर व विष्णू मोंडकर यांची नावे चर्चेत असताना यापैकी कोण उमेदवारी अर्ज भरेल, हे निश्चित होत नव्हते. तरीही अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी मालवण येथील विष्णू मोंडकर यांनी भाजपामधून अर्ज भरला. या मतदार संघातून अपक्ष म्हणून किशोर शिरोडकर (कुडाळ), स्रेहा केरकर (तारकर्ली), लवू वारंग (नानेली) यांनी, तर बसपामधून रवींद्र कसालकर यांनी शुक्रवारी अर्ज भरलेला आहे. या मतदारसंघात एकूण ९ उमेदवार असणार आहेत. (प्रतिनिधी)