चिपळुणात प्रथमच मॅटवर कबड्डी स्पधा
By Admin | Updated: November 5, 2014 00:06 IST2014-11-04T21:25:31+5:302014-11-05T00:06:47+5:30
जिल्हास्तरावर आयोजन : निमंत्रित संघांनाच सहभागाची संर्धी

चिपळुणात प्रथमच मॅटवर कबड्डी स्पधा
चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ व ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे दि. ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान जिल्हास्तरीय निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा प्रथमच मॅटवर खेळविली जाणार आहे. स्पर्धेमध्ये नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. शहरातील जुना कालभैरव मंदिर नजीकच्या सागर मंचसमोरील मैदानावर सुरेश शेट्ये क्रीडा नगरीत सायंकाळी ५ नंतर या स्पर्धा होणार आहेत. प्रकाशझोतात खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये न्यू हिंद विजय, नम्रता प्रतिष्ठान, गुरुकुल क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ, दसपटी क्रीडा मंडळ, गजानन संघर्ष क्रीडा मंडळ, वाघजाई क्रीडा मंडळ, कळकवणे क्रीडा मंडळ हे संघ स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण ही संस्था १९८२ मध्ये मनोहर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. त्यानंतर अॅड. प्रकाश सोमण यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सध्या या संस्थेच्या अध्यक्षपदी भाऊ काटदरे आहेत. क्रीडा क्षेत्राबरोबरच संस्थेने सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. सामाजिक बांधिलकी जपताना नेत्रदान हा संकल्प सुरु केला. संस्थेने यावर्षी कालभैरव जयंतीचे औचित्य साधून कालभैरव चषक ही मॅटवरील कबड्डी स्पर्धा भरविण्याबाबत नियोजन केले आहे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे, अशी माहिती संघर्ष क्रीडा मंडळाचे खेळाडू व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दिली. यावेळी कालभैरव देवस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त समीर शेट्ये, नयन साडविलकर, कमलाकर बेंडके, मुन्ना कदम, भाऊ पवार, रवींद्र लवेकर, विकास पवार आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने घेतली जाणार आहे. नामवंत खेळाडू स्वप्नील शिंदे, सतीश खांबे, शैलेश सावंत, भूषण कुलकर्णी, शेखर तटकरी, बाबू शिंदे, प्रांजल पवार व गोट्या कुंभार आदी खेळाडूही स्थानिक संघातून खेळणार आहेत. विजेत्या संघाला २१ हजार रुपये, उपविजेत्या संघाला १५ हजार , कालभैरव चषक तसेच तृतीय संघाला १० हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकाला ५ हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू, दमदार चढाई व उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडंूनाही गौरविण्यात येणार आहे. ५ हजार क्रीडापे्रमी सामावतील, अशी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. केबल नेटवर्कवरुन याचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याने याचा आनंद घरबसल्या घेता येणार आहे. (वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणार स्पर्धा.
सर्वोत्कृष्ट खेळाडू, दमदार चढाई व उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडंूनाही गौरविण्यात येणार.
साखळी व बाद पद्धतीने घेतली जाणार जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा.