चिपळुणात मॅटवरील कबड्डी स्पर्धा सुरू
By Admin | Updated: November 9, 2014 23:33 IST2014-11-09T21:38:48+5:302014-11-09T23:33:56+5:30
पहिल्याच स्पर्धा : कालभैव मंदिर परिसरात कबड्डीप्रेमींची मोठी गर्दी

चिपळुणात मॅटवरील कबड्डी स्पर्धा सुरू
चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ व जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन काल (शनिवारी) सायंकाळी उत्साही वातावरणात करण्यात आले. या कबड्डी स्पर्धा कालभैरव मंदिरच्या प्रांगणात सुरेश शेट्ये क्रीडा नगरीत होत आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन लोकमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांच्या हस्ते झाले. क्रीडानगरीचे उद्घाटन माजी आमदार रमेश कदम, राजेश कदम आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादी काँगे्रसचे शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, कालभैरव देवस्थान प्रतिष्ठानचे विश्वस्त समीर शेट्ये, पंकज कोळवणकर, नयन साडविलकर, भाऊ पवार, संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भाऊ काटदरे, चंद्रशेखर लाड, नगरसेवक मिलिंद कापडी, सुचय रेडीज, रामदास सावंत, नगर परिषदेच्या आरोग्य समिती सभापती आदिती देशपांडे, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक बाबू तांबे, डॉ. दीपक विखारे, बाबुराव खातू, रवी लवेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
पहिला सामना संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण विरुद्ध दसपटी क्रीडा मंडळ या संघात झाला. मध्यंतराच्या सामन्यापर्यंत संघर्ष क्रीडा मंडळाला २० गुण, तर दसपटी क्रीडा मंडळाला १५ गुण मिळाले होते. ५ गुणांच्या आघाडीवर यजमान संघर्ष क्रीडा संघ खेळत होता. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दसपटीचा प्रांजल पवार याने उत्कृष्ट चढाई करुन सामना आपल्या बाजूने फिरविला. संघर्ष क्रीडा मंडळाच्या योगेश कांबळेनेही संघाला विजयी होण्यासाठी चांगली पकड केली. मात्र, शेवटच्या ५ मिनिटात अत्यंत चुरशीची चढाई होऊन दसपटी क्रीडा मंडळाने ४१ गुण, तर संघर्ष क्रीडा मंडळाने २५ गुण मिळविले. १६ गुणांची आघाडी घेऊन दसपटीने पहिल्या राऊंडमध्ये आपल्या विजयाची छाप पाडली होती. या स्पर्धेमध्ये पुणेरी पलटण या संघात कबड्डी प्रो स्पर्धेत खेळणारा स्वप्नील शिंदे याने उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण आठ संघांनी सहभाग दर्शविला आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम दि. १० रोजी सायंकाळी उशिरा होणार आहे. चिपळूण येथे प्रथमच जिल्हास्तरीय मॅटवरील क्रीडा स्पर्धा होत असल्याने ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. क्रीडांगणाच्या तिन्ही बाजूला भव्य गॅलरी उभारण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत या स्पर्धा प्रकाशझोतात साखळी पद्धतीने खेळविल्या जात आहेत. (वार्ताहर)