गरज पडली तर फक्त एक फोन करा
By Admin | Updated: October 30, 2015 23:19 IST2015-10-30T21:50:17+5:302015-10-30T23:19:26+5:30
प्रमोद मकेश्वर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीतर्फे चर्चासत्र

गरज पडली तर फक्त एक फोन करा
चिपळूण : आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. कोणतेही काम लाच दिल्याखेरीज होत नाही, असा सर्वसामान्यांनी समज करुन घेतला आहे. याचाच फायदा काही सरकारी कर्मचारी घेत आहेत. सरकारच्या योजना आपल्या भल्यासाठी असतात मग लाच कशासाठी द्यायची, असा प्रश्न उपस्थित करुन कामं अडली, गरज पडली तर फक्त एक फोन करा. आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर असू. आपले नाव गुप्त ठेवले जाईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश गुरव यांनी सांगितले.
चिपळूण पोलीस ठाण्याच्या बहुउद्देशीय सभागृहात गुरुवारी सकाळी पोलीसपाटील, पोलीसमित्र, प्रतिष्ठीत नागरिक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांचे चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी लाच कशी व कशा प्रकारे घेतली जाते. त्यावर आपण नियंत्रण कसे आणू शकतो. याबाबतची सविस्तर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव यांनी दिली. तुम्ही समाजात घडणाऱ्या अशा गोष्टींबाबत ०२३५२-२२२८९३ या दूरध्वनी क्रमांकावर माहिती दिल्यास त्याची खातरजमा करुन गुन्हेगारावर कारवाई केली जाईल. तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्याची काळजी नको, असा विश्वास गुरव यांनी दिला.
आपल्या हक्कासाठी किंवा कुठलाही सरकारी दाखला लाच दिल्याशिवाय मिळत नाही. मात्र, दाखला मिळवणे हा आपला हक्क आहे, तो मिळवण्यासाठी आपण लाच का द्यायची? आपण जागरूक असू, तर लाच द्यायचा प्रश्नच उद्भवणार नाही. लाच देणे आणि एखाद्याकडून लाच घेणे हा गुन्हा आहे. याबाबत पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी माहिती दिली. यावेळी पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष दिलावर खडपोलकर, त्यांचे सर्व सहकारी, पोलीस मित्र, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या गावात व आपल्या भागात असे लाच घेण्याचे प्रकार निदर्शनास आले तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
लाच घेणे - देणे हे दोन्हीही सारखेच गुन्हे आहेत. लाचखोरी पूर्णत: नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ती पूर्णत: नष्ट होत नसल्याचे दिसत आहे. शासकीय कार्यालयाला लागलेली ही कीड असून, अनेक अधिकारी व कर्मचारी सापळ्यात अडकले आहेत. तरीदेखील लाचखोरीचे प्रकार घडत असल्याने लाचखोरी थांबणार कधी ?
काम अडले, गरज पडली तर फोनवर काम.
एसीबी हेल्पलाईनसाठी १०६४ टोल फ्री क्रमांक डायल करा.
हक्क मिळवण्यासाठी लाच का?
लाच देणे-घेणे हा गुन्हा आहे, याबाबत जनजागृती व्हायला हवी.
जनतेचे प्रबोधन करण्याची गरज.