जामडूल अंगणवाडीची दुरवस्था
By Admin | Updated: July 23, 2015 00:01 IST2015-07-22T22:01:47+5:302015-07-23T00:01:08+5:30
मागणी करूनही दुर्लक्ष : मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जामडूल अंगणवाडीची दुरवस्था
आचरा : डोक्यावर धोकादायक छप्पर...जीव टांगणीला... अशीच काहीशी स्थिती आचराबाग-जामडूल येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांची आहे. शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या या मुलांच्या सुरक्षेकडे महिला बालकल्याण विभागाचे तीन वर्षे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे. एकीकडे एकाच दिवसात २०६ कोटींच्या खरेदीनंतर चर्चेत असणारे राज्याचे महिला बालकल्याण खाते मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मालवण तालुक्यातील आचराबाग-जामडूल येथे प्राथमिक शाळेला लागून अंगणवाडीची इमारत आहे. येथे १३ मुले शिक्षणाचे धडे गिरवतात. या अंगणवाडीचे छप्पर पूर्णत: मोडकळीस आले आहे. सन २०१२ पासून येथील अंगणवाडी सेविका करिष्मा हिर्लेकर यांनी आचरा ग्रामपंचायत, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी, मालवण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. (वार्ताहर)
पुरेसा निधी नाही
आचरा सरपंच मंगेश टेमकर यांनी पुरेसा निधी ग्रामपंचायतीकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेने लक्ष द्यावे, अशी सूचना मांडली आहे. तर मुलांच्या सुरक्षेचा विचार करता प्राथमिक शाळेत मुलांना बसण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे. तरी याबाबत लक्ष घालून इमारत दुरुस्तीस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.