कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक धडकणार!
By Admin | Updated: July 19, 2015 23:35 IST2015-07-19T23:28:37+5:302015-07-19T23:35:01+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : संपूर्ण राज्यात होणार एकाच दिवशी मोर्चा

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक धडकणार!
वाटूळ : संचमान्यतेचे बदललेले निकष, वाढीव पदावरील मंजूर शिक्षकांना तत्काळ वेतन सुुरु करणे अशा महत्त्वाच्या मागण्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने राज्यभरातील ६० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक २२ जुलै रोजी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.२० जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ जुलैपासून आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना महासंघातर्फे देण्यात आला आहे. संचमान्यतेच्या नव्या निकषामुळे ३ हजार अनुदानित तुकड्या कमी होऊन राज्यभरातील १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. २००३ ते २०११ पर्यंतच्या एक हजार वाढीव पदांना मंजूरी देण्याचा निर्णय शासनाने २ मार्च २०१४ रोजी घेतला. परंतु त्या शिक्षकांच्या वेतनाची कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याने या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षक आता आक्रमक झाले आहेत.
गेल्या कित्येक वर्षापासून या प्रश्नांवर संघटना आंदोलने करीत असून, प्रत्येक वेळी शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले असल्याने यावेळी चार टप्प्यांमध्ये संघटनेने आंदोलन पुकारले असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश औताडे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यामध्ये २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तद्नंतर २४ जुलै रोजी राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. त्यानंतर २८ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे जेल भरो आंदोलन तसेच शेवटच्या टप्प्यात लोकमान्य टिळक पु्ण्यतिथी दिनी १ आॅगस्ट रोजी प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ करणार आहेत. (वार्ताहर)
५आॅनलाईन संचमान्यतेसंबंधित निकषांमुळे ज्युनिअर कॉलेजमध्ये सुमारे १० हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. तसेच संचमान्यतेच्या सॉफ्टवेअरच्या त्रुटींमुळे जेवढ्या तुकड्या कमी तेवढे शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे. परिणामी संचमान्यता न झाल्यास नियमीत शिक्षकांचे पगारदेखील रखडणार आहेत. तसेच आणखी महत्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आंदोलनात सक्रिय सहभागी घ्या.
- प्रा. प्रकाश औताडे,
अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय संघटना, रत्नागिरी.