जगबुडी पूल प्रश्न मार्गी?
By Admin | Updated: January 14, 2015 00:43 IST2015-01-13T23:54:02+5:302015-01-14T00:43:03+5:30
बेचाळीस गावांचा प्रश्न : राजकीय साठमारीत महत्त्वाचा प्रश्न राहिला मागे

जगबुडी पूल प्रश्न मार्गी?
श्रीकांत चाळके -खेड तालुक्यातील अठरा गाव धवडेबांदर विभागातील ४२ गावांचे जीवनमान पुन्हा एकदा धोक्यात आले आहे़ मात्र, सुकिवली येथील जगबुडी नदीवरील पुलाला मंजुरी देणारे रामदास कदम मंत्री झाल्याने या भागातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या मार्गावरील सुकिवली येथील चोरद नदीवरील पुलाचे घोंगडे यावर्षीदेखील भिजत राहणार असल्याने, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ सुमारे २ कोटी रूपयांच्या या कामाला निधी मंजूर होऊनही राजकीय श्रेयासाठी पुलाचे काम रखडले आहे. आघाडी सरकारच्या काळात या पुलाला हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. मात्र काम ठप्पच राहिले. पूर्वी रामदास कदम यांनीच या पुलाच्या कामास मंजुरी दिली होती. आता तेच मंत्री झाल्याने, हे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेली ५० वर्षे या पुलावरून पावसाळ्यात धोकादायक वाहतूक सुरू आहे़ या पुलाची उंची कमी असल्यामुळे, पुलावर पावसाळ््यात तीन ते चार फूट पाणी असते. त्यामुळे आसपासच्या ४२ गावांचा दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. पुलावरील पाणी दोन दोन दिवस राहत असल्याने, गंभीर परिस्थिती निर्माण होते. पावसाळ््यात अन्य मार्ग नसल्याने बहुसंख्य लोकांच्या दैनंदिन दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. रहदारी ठप्प होते. वाहतूक ठप्प होेते.
२००४ व २००५ मधील महापुरात येथे मोठी आर्थिक हानी झाली होती. लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. अनेकांची शेतीही वाहून गेली होती. सातत्याने येत असलेल्या या पुरामुळे परिसरातील सर्व उद्योग बंद पडतात़. येथील जगबुडी व चोरद नदीतील पाण्यामुळे या पुलालाही धोका निर्माण झाला आहे़ याबाबत सातत्याने आवाज उठवल्यानंतर बांधकाम विभागाच्या अभियंत्याकरवी या पुलाच्या परिस्थितीची पाहणी करण्यात आली होती़ दोन वर्षांपूर्वी ऐन पावसाळ्यात या पुलाच्या बांधकामाबाबत घोषणा करण्यात आली होती़ त्यावेळी शिवसेनेच्यावतीने पुलाच्या बांधकामासाठी विशेष प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले होते़ तर राष्टवादी काँग्रेसच्यावतीने या पुलाला आम्ही मंजुरी दिल्याचे सांगत, लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे संकेत दिले होते़ प्रत्यक्षात मात्र या पुलाला रामदास कदम असतानाच मंजुरी देण्यात आल्याचे उघड झाले आहे़ भास्कर जाधव यांनी मंत्री असतानाच, हे काम तातडीने सुरू करण्याचे संकेत दिले होते़ आता १ वर्ष उलटून गेले़ तरीही पुलाच्या कामास प्रारंभ झाला नाही़
बांधकाम कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे़ कदम यांच्या विशेष प्रयत्नाने हे काम आता लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.