ज्युडोमध्ये दोन कास्यंपदके
By Admin | Updated: December 2, 2014 00:23 IST2014-12-01T22:27:19+5:302014-12-02T00:23:15+5:30
राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त ४५० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते.

ज्युडोमध्ये दोन कास्यंपदके
तळेरे : महाराष्ट्र ज्युडो असोसिएशन व नंदूरबार ज्युडो असोसिएशनच्यावतीने आयोजित ४२ व्या युथ आणि ज्युनिअर्स राज्य चॅम्पियनशीप २०१४ व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन कांस्यपदके मिळाली आहेत. ही स्पर्धा नंदूरबार येथे झाली. या स्पर्धेला राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त ४५० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. १२ ते १७ वयोगटात कासार्डे ज्युनिअर कॉलेजची खेळाडू प्राची खांडेकर हिने ४८ किलो वजनी गटात मुंबई व कोल्हापूरच्या खेळाडूंवर मात करीत कांस्य पदक पटकावले. कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या प्रणय काडगे याने ४० किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण ७ खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. यामध्ये कल्पेश तळेकर, सिद्धेश राणे, अनिल जाधव, अमोल तेजम, साहिल कुबडे यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय भोसले, सचिव दत्ता आफणे, शैलेश टिळक यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशस्वी खेळाडूंना ज्युडो प्रशिक्षक दत्तात्रय मारकड, अभिजीत शेटये, राकेश मुणगेकर, निळकंठ शेटये, सिद्धेश माईणकर, रूपेश कानसे आदींचे मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग जिल्हा ज्युडो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कुलकर्णी, कासार्डे शिक्षण संस्थेचे संस्था पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर, मधुकर खाडये, प्राचार्य पी. एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. बी. शेख, पर्यवेक्षक ए. ए. मुदाळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. (वार्ताहर)