जेटीसाठी आरोंद्यात कांदळवनाची तोड

By Admin | Updated: December 2, 2014 00:29 IST2014-12-01T21:50:43+5:302014-12-02T00:29:01+5:30

संघर्ष समितीचा आरोप : उध्दव ठाकरेंना निवेदन

For the jetties, the breakdown of kandlavana | जेटीसाठी आरोंद्यात कांदळवनाची तोड

जेटीसाठी आरोंद्यात कांदळवनाची तोड

आरोंदा : आरोंदा येथे प्रस्तावित हॉटेल प्रकल्पासाठी अकृषक परवाना नाकारला होता, असे असताना त्याच ठिकाणी जेटीचा प्रकल्प होत आहे. आणि या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात कांदळवनाची तोड झाली आहे. तसेच कांदळवन प्रकारात येणाऱ्या वनस्पतीचे अवशेषही तोडले गेले आहेत. उच्च न्यायालयाने कांदळवन तोडीस पूर्णपणे बंदी घातली आहे, असे असतानाही या परिसरात जेटीमुळे झालेल्या कांदळवनाच्या तोेडीची चौकशी करा, अशी मागणी निवेदनाद्वारे आरोंदा बचाव संघर्ष समितीच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात आरोंदा बचाव समितीने अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला असून यात में. व्हाईट आॅर्चिड इस्टेट प्रा. लि. चेंबूर ही कंपनी जेटी प्रकल्प उभारत असून या प्रकल्पामुळे परिसरातील शेती बागायती नष्ट होतील. किरणपाणी नदीचे अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
आरोंदा येथे जी जेटी बांधण्यात येत आहे. ती शेतजमिनीत बांधण्यात येत असून सीआरझेडचेही मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. काहीजण सत्ता व संपत्तीच्या जोरावर ही जेटी बांधत असून शासनाला खोटी माहितीही देण्यात आली आहे. पोर्तुगीज काळापासून जेटी होती हे असत्य असून पोर्तुगीजांचा अंमल हा गोव्यात होता.
तो केव्हाच आमच्याकडील बाजूला नव्हता. पण काहीजण तो चुकीच्या पध्दतीने इतिहास रंगवून जेटी प्रकल्प आणू पाहत आहेत. सध्या जी जेटी करू पाहत आहेत. तेथे नदीच्या बंधाऱ्यापासून रक्षण व्हावे, म्हणून तसेच जमिनीची धूप होऊ नये, यासाठी बंधाऱ्याला लागून नदीत ५० ते ६० मीटर अंतरावर दगडाचे ढीग निर्माण केले होते. त्याला वरली असे म्हणत. आरोंद्यापासून तळवणेपर्यंत ही वरली आजही दिसत असून यामुळे अनेक सागरी वनस्पतीही वाढल्या आहेत.
या वनस्पती वाढल्याने मत्स्य उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे संघर्ष समितीने पत्रकात म्हटले आहे. किरणपाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत आहे. खाडीपात्राची खोलीही वाढली असून यामुळे खारबंधाऱ्याला धोका उद्भवू शकतो. नजीकच्या विहिरींनाही गोड्या ऐवजी खाऱ्या पाण्याचा निचरा होऊ शकतो. या क्षेत्रात जेटीमुळे कांदळवनाचीही मोठ्या प्रमाणात तोड झाली असून या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो, पण याचे कोणी भान राखत नाही, असा आरोपही या समितीने केला आहे.
या कांदळवनाची पूर्वीची माहिती हवी असल्यास सरकारने नागपूर खनिकर्मचा पूर्वीचा नकाशा बघावा म्हणजे सर्व वस्तुस्थिती उजेडात येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे. हे पत्रक निवेदनाद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले आहे. ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणात शिवसेना लक्ष घालून न्याय देईल, असे आश्वासन दिले आहे.
या निवेदनावर आरोंदा बचाव संघर्ष समितीच्या अविनाश शिरोडकर, प्रशांत नाईक, मनोहर आरोंदेकर, विद्याधर नाईक, शेखर पोखरे, रूपेश मठकर, हनुमंत कुबल आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: For the jetties, the breakdown of kandlavana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.