जयश्री हडकरला सुवर्णपदक
By Admin | Updated: September 14, 2014 23:57 IST2014-09-14T22:19:12+5:302014-09-14T23:57:33+5:30
जिल्ह्याचे नाव उज्ज्वल : मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा

जयश्री हडकरला सुवर्णपदक
मालवण : मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत मालवणच्या स्पर्धक जयश्री श्रीनिवास हडकर यांनी ५५ च्या पुढील गटात सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. हडकर यांना आकर्षक सुवर्ण चषक, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मलेशियन योग सोसायटी यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जगभरातील सहाहून अधिक देशातील योग साधकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. हडकर यांच्या गटात १४ स्पर्धकांचा सहभाग होता. पुुरुष आणि स्त्री अशा एकत्रित गटातून हडकर यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. योग स्पर्धेत जिल्ह्यातील प्रथमच एका ज्येष्ठ महिला स्पर्धकाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केल्याने सर्वच स्तरातून गुरु आणि शिष्य यांचे कौतुक होत आहे.
नाशिक येथील योगविद्या गुरुकुल यांच्या पुढाकारातून मालवण येथील निरामय प्रतिष्ठानच्या योगगुरु उमा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हडकर यांनी हे यश संपादन केले आहे. चौगुले याही या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ३५ ते ४५ वयोगटात आपले सुपरसिक्समध्ये स्थान मिळविले होते. पुरुष आणि स्त्रिया असा एकत्रित गट याही स्पर्धेत खेळविण्यात आला होता. त्यांना या गटात सहावा क्रमांक मिळाला.
या स्पर्धेत भारतातून महाराष्ट्रातील ५५ आणि गुजरातमधील २५ स्पर्धक असे ७५ स्पर्धकांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. भारताने या स्पर्धेत ४५ पदके पटकावून प्रथम स्थान मिळविले तर चॅम्पियन आॅफ चॅम्पियन स्पर्धेत ८ वर्षीय सोलापूरच्या योगेश परदेशीने चॅम्पियन हा किताब पटकावला. या स्पर्धेत सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया तसेच इतरही देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील स्पर्धकांना नाशिक येथे प्रथम प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर मुंबईमार्गे कोललंपूर येथे नेण्यात आले. त्यानंतर थायलंड, पटाया, बँकॉक असे फिरवून मलेशिया याठिकाणी स्पर्धेला नेण्यात आले.
सरावातून यश शक्य
जयश्री हडकर यांचे यश हे युवा खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारे आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी ५५ पुढील वयोगटात सहभागी होत हडकर यांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. त्यांच्या कौशल्यावर खूष होऊन मलेशियन स्पर्धकांनी त्यांना ‘यंग लेडी’ अशी उपाधी देऊन गौरव केला. जिद्द, मेहनत, गुरुवरील व योगसाधनेवरील निष्ठा या सर्वांचे रुपांतर त्यांनी सुवर्णपदकात केले, अशी प्रतिक्रिया योगगुरु उमा चौगुले यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
अविस्मरणीय प्रसंग
वायरी शाळा नंबर एक येथून वय वर्षे ५८ झाल्यानंतर आपण मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यावेळी हृदयविकार, गुडघेदुखी अशा आजारांनी जखडलेले होते. त्याचवेळी डॉ. चौगुले यांचा लेख माझा भाऊ डॉ. अशोक आचरेकर यांच्या वाचनात आला आणि त्यांच्या सूचनेनंतर आपण योगा करण्यासाठी डॉ. चौगुले यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि काही महिन्यातच आजारापासून मुक्ती मिळत असताना आहारावर नियंत्रण ठेवले. चहा, बेसणाला कायमची सुट्टी दिली. दुपारी १२.३० वाजता आणि रात्री ८.३० वाजता जेवण आणि नियमितपणे योगाचा सराव यातूनच आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचे धाडस झाले. या यशाचे सर्व श्रेय डॉ. चौगुले यांनाच जाते, असे हडकर म्हणाल्या.