सिंधुदुर्ग जिल्ह्याला जत्रोत्सवाचे वेध
By Admin | Updated: October 31, 2014 23:31 IST2014-10-31T23:28:09+5:302014-10-31T23:31:41+5:30
त्रिपुरारी पौर्णिमेपासून प्रारंभ : वार्षिक दहीकाला उत्सवाचे आकर्षण, दशावतारी मंडळे सज्ज

सिंधुदुर्ग जिल्ह्याला जत्रोत्सवाचे वेध
महेश सरनाईक - कणकवली
‘रात्रीचा राजा, सकाळी डोक्यावर बोजा’ या ब्रीदवाक्याप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेपासून भंडाऱ्याच्या पौर्णिमेपर्यंत (सुमारे ४ महिन्यांचा कालावधी) सिंधुदुर्गातील गावागावात वार्षिक जत्रोत्सवानिमित्त दशावतारी नाटके रंगणार आहेत. अनादी काळापासून सुरू असलेली ही लोककला आजही तेवढ्याच ताकदीने सामाजिक व धार्मिकतेचा संदेश देत आहे. सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना आता वार्षिक जत्रोत्सवांचे वेध लागले आहेत.
जिल्ह्यातील गावागावात त्रिपुरारी पौर्णिमेपासून वार्षिक जत्रोत्सवांना प्रारंभ होतो. गाव तेथे मंदिर आणि मंदिर तेथे जत्रोत्सव अशी काहीशी संकल्पना पहायला मिळते. ग्रामदेवतेच्या मंदिरात जत्रोत्सवानिमित्त वार्षिक ‘दहीकाला’ (दहीहंडी) उत्सव असतो. पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळे प्रत्येक गावात जावून आपले वार्षिक फेडताना आढळतात.
या जत्रोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण धार्मिकतेने नटून जाते. दरदिवशी लाखो रूपयांची उलाढालही त्यानिमित्ताने होत असते. गावागावातील लोक या जत्रोत्सवानिमित्त एकत्र येतात. त्यातून विचारांची देवाणघेवाण होते आणि अनेक विषय मार्गीदेखील लागतात.
पूर्वीपासून पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळे ही कला सादर करत आली आहेत. पूर्वीच्या काळी मर्यादीत नाटक कंपन्या होत्या. आता जिल्ह्यात ६0 ते ६५ दशावतारी नाट्यकंपन्या झाल्या आहेत. त्यामुळे जत्रोत्सवांमध्ये दशावतारी नाटकांना मागणीदेखील वाढत आहे.
पूर्वीच्या काळी वार्षिक जत्रोत्सव म्हटले की, मोठ्या प्रमाणावर पट, जुगार चालायचा. मग त्यात मारामारीचे प्रसंगही उद्भवायचे. परंतु अलिकडे जत्रोत्सवामध्ये जुगाराला बंदी आहे. त्यामुळे मारामारीचे प्रसंगी बंद झाले आहेत. त्यामुळे केवळ धार्मिकतेने या कलेकडे पाहिले जात आहे. जत्रोत्सवादरम्यानचे पट, जुगार बंद झाल्यामुळे आता देवकार्यामध्ये वाढ होत असून लोक मोठ्या संख्येने उत्सवाचा आनंद लुटत आहेत.
गावागावात जाऊन वार्षिक दहीकाला उत्सव साजरे करण्यासाठी दशावतारी नाट्यमंडळेही सज्ज झाली असून काही कंपन्यांमध्ये या दशावतारी कलावंतांची देवाण-घेवाणदेखील झाली आहे.
अनादी काळापासूनची लोककला
दशावतार ही अनादी काळापासूनची लोककला आहे. या कलेचा उल्लेख शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांमध्ये तसेच दासबोधामध्येसुद्धा आहे. या कलेचा जन्म कोकणभूमीतच झाला असल्याचे ज्येष्ठ दशावतारी कलावंताचे म्हणणे आहे. सिंधुदुर्गात पूर्वपरंपरागत पद्धतीने वर्षानुवर्षे ही कला जोपासण्याचे काम कलावंत करत आहेत.
ट्रीकसीनकडे ओढा
दशावतारी नाटकांमध्ये ट्रीकसीनचा वापर करण्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी काही ज्येष्ठ कलावंतांनी केला. त्याला येथील जनतेचा सध्या उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.