जातपंचायतीकडून मारहाण, तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: April 24, 2017 23:28 IST2017-04-24T23:28:12+5:302017-04-24T23:28:12+5:30
जातपंचायतीकडून मारहाण, तरुणाची आत्महत्या

जातपंचायतीकडून मारहाण, तरुणाची आत्महत्या
दापोली : प्रेम केले म्हणून गावपुढाऱ्यांनी जातपंचायत बोलावून एका तरुणाला रात्रभर डांबून ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार दापोली तालुक्यात घडला आहे. सुजन चव्हाण असे या तरुणाचे नाव असून, या मारहाणीच्या घटनेमुळे त्याने आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये मारहाणीचा विषय नमूद केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेला चार दिवस झाले तरी अजूनही त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
मृत सुजन हा दापोली तालुक्यातील ओणीभाटी गावातील आहे. त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अद्यापही कोणाला अटक केलेली नसून, सुजनच्या आई आणि वडिलांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या घटनेची दाभोळ पोलिसांत तक्रार देण्यात येऊनही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सुजनचे जवळच्याच भडवली गावात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. याच प्रेमाखातर सुजन भडवली गावामध्ये गेला होता. त्याच्यासोबत त्याचा चुलत भाऊही होता. मात्र, तेथे गावच्या काही प्रमुख लोकांनी त्याचा जाब विचारत जातपंचायत बोलावली. भर बैठकीत सुजनला संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी आणि गावपुढाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांनी सुजनला डांबून ठेवले असल्याची माहिती सुजनच्या चुलतभावाने दिली आहे. या सगळ्यामध्ये त्याचा हा चुलतभाऊ साक्षीदार आहे. या सगळ्याचा मनस्ताप होऊन सुजन दि. २१ एप्रिल रोजी आपल्या घरी आला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. (प्रतिनिधी)