..तर नगरपंचायत जिंकली असती
By Admin | Updated: May 30, 2016 00:47 IST2016-05-29T23:27:49+5:302016-05-30T00:47:12+5:30
शंकर कांबळी : कुवत नसलेल्यांना दिली उमेदवारी

..तर नगरपंचायत जिंकली असती
कुडाळ नगरपंचायत जिंकली असती. ज्या उमेदवारांची कुवत नाही, अशा उमेदवारांचे नेतृत्व पक्षाने पाहिले नाही. त्यामुळेच कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागला, असे यावेळी माजी आमदार शंकर कांबळी यांनी स्पष्ट केले. ते सालईवाडा येथील कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये अधिपत्य स्थापन करायचे असेल, तर एकमुखाने, एकदिलाने काम करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी असली पाहिजे. तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ यांचे नेतृत्वगुण पाहता त्यांना आमदारकी लढविण्याची संधी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शंकर कांबळी यांनी केले.
शिवसेनेतर्फे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर येथील गणेश हॉल-सालईवाडा येथे रविवारी पार पडले. शिबिराच्या प्रारंभप्रसंगी अध्यक्षस्थानी कांबळी बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख राजू नाईक, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, एस.टी. कामगार सेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत कासार, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, एकनाथ गोसावी, श्रृतिका दळवी, रश्मी माळवंदे, नगरसेविका शुभांगी सुकी, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, शहरप्रमुख शब्बीर मणियार, युवा सेना तालुकाध्यक्ष सागर नाणोसकर, श्रेया परब, अशोक दळवी, सुवर्णा कोठावळे, मंदार शिरसाट आदी उपस्थित होते.
माजी आमदार कांबळी म्हणाले, सर्वांनीच पक्षाची उपेक्षा केली तर पक्षाचे नुकसान आहे. त्यामुळे मी करेन तेच खरे, असे केल्यास पक्षाला याचा हादरा बसू शकतो. अत्यंत सावधगिरीने पक्षाची बांधणी करून चांगले नेतृत्व करा, असा सल्ला कांबळी यांनी दिला.
तालुकाप्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, ज्यावेळी शिवसेना पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिकट परिस्थिती होती, त्यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुखाची जबाबदारी आपण हाती घेतली. त्यावेळी तालुक्यात काही ठिकाणी शाखाप्रमुख, विभागप्रमुख कार्यरत नव्हते. अशा ठिकाणी शैलेश परब व अन्य कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकारिणीची निवड केली व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
राजू नाईक म्हणाले, कुठलाही कार्यक्रम अथवा सभा घेताना आपल्या कार्यकर्त्यांना डावलू नका. मतभेद न करता सर्वांना सोबत घेऊन काम करा, असा संदेश दिला. तर उपशहर संघटक श्रृतिका दळवी, युवा सेना तालुकाध्यक्ष सागर नाणोसकर, समीर मामलेकर यांचेही यावेळी विशेष अभिनंदन केले. (वार्ताहर)
कांबळींना विश्वास : नारायण राणे आमदार होणार
नारायण राणे हे आता आमदार होणार हे निश्चित आहे. ते आता अजून ताकदीने काम करणार आहेत. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जोमाने काम करा, असे आवाहन शंकर कांबळी यांनी केले.