हे वैभव पहायला शिवसेनाप्रमुख हवे होते
By Admin | Updated: January 5, 2015 00:38 IST2015-01-04T22:58:35+5:302015-01-05T00:38:45+5:30
दीपक सावंत : वळीवंडे येथे आरोग्यमंत्र्यांचा नागरी सत्कार

हे वैभव पहायला शिवसेनाप्रमुख हवे होते
शिरगांव : माझ्या यशामध्ये माझ्या आईचा फार मोठा वाटा आहे. पक्षप्रमुख व शिवसेनाप्रमुख ही आयुष्यातील मोठी दैवतं आहेत. त्यांची साथ आणि आशीर्वाद आयुष्यभर लाभला. त्यांचा जवळचा सहवास त्यांची सुश्रृषा करण्याचा योग आला. एकहाती ६३ आमदार निवडून आणले हे वैभव पहायला शिवसेनाप्रमुख हवे होते, असे भावोद्गार राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी वळीवंडे येथे काढले.
वळीवंडे ग्रामस्थ ग्रामहितवर्धक मंडळाच्यावतीने डॉ. दीपक सावंत, अर्थ व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांचा नागरी सत्कार वळीवंडे येथे करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. दीपक सावंत म्हणाले, शिवसेना हे एक कुटुंब आहे. एकमेकांविषयी प्रेमभावना असलेल्या भावनिक नात्याने शिवसेना जोडली गेली आहे. त्यामुळे कोणीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता आहे हे मान्य आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा कितीतरी कमी खर्चात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण दिले जाते. करार पूर्ण झाल्यावर खासगी प्रॅक्टीस करण्याची स्पर्धा लागली आहे. ग्रामीण भागाकडे काम करण्याची त्यांची मानसिकता नाही. ही मानसिकता बदलायला हवी. डॉ. कोटणीस, डॉ. प्रकाश आमटे यांसारखे ग्रामीण भागात सेवा देणारे डॉक्टर्स निर्माण होणे गरजेचे आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, भाईसाहेब सावंत आरोग्य मंत्री असताना आरोग्य विभागाचा झपाट्याने विकास झाला. आता या आरोग्य यंत्रणेला डॉ. दीपक सावंत यांच्या रूपाने पालक मिळाले आहेत. ते टेलीमेडिसीनची संकल्पना आपल्या कृतीतून निश्चितच साकारतील. वळीवंडे गावच्या विकासासाठी २० लाखाचा निधी दिला जाईल. देवगड तालुक्याचा पाणी प्रश्न गंभीर असून येत्या दोन-तीन वर्षात यावर कायमची उपाययोजना केली जाईल. पर्यटनावर आधारीत विकास हा येथील ऐतिहासिक वारसा व वैभव जपून करण्यावर भर दिला जाईल. सर्वांच्या साक्षीने संपन्न व समृद्ध सिंधुदुर्ग जिल्हा घडवायचा आहे. जिल्हा नियोजन मंडळावर देवगड तालुक्याला भाजपाचे सदाशिव ओगले यांना संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. नाईक म्हणाले, विकासाची दूरदृष्टी असलेले मंत्री जिल्ह्याला मिळाले. देवगड तालुक्यालाही राज्यात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली ही गौरवाची गोष्ट आहे. डॉ. दीपक सावंत यांनी विविध वैद्यकीय उपक्रम राबवून जन्मभूमीची सेवा केली आहे. योग्य माणसाकडे योग्य पद पक्षप्रमुखांनी सोपवले. या जिल्ह्याचा आता नियोजनबद्ध विकास होईल, यात शंका नाही.
या नागरी सत्कार सोहळ््यात डॉ. दीपक सावंत, दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून वळीवंडे गावाच्यावतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनिला सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद गावडे, सरपंच विरेंद्र सावंत, तहसीलदार जीवन कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, तालुकाप्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव ओगले, पंचायत समिती सदस्य सदानंद देसाई, संतोष किंजवडेकर, माजी उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजु, वळीवंडे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे संस्थापक रामचंद्र सावंत, सचिव राजू सावंत, मुंबई अध्यक्ष केशव सावंत, डॉ. राऊत, कुणकेरीचे शशिकांत सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)